पुणे : तबला आणि पखवाजवादनाची जोरकस जुगलबंदी आणि संतूरवाद नातून उमटलेल्या शांत स्वरांची अनुभूती रसिकांनी घेतली. निमित्त होते जगविख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या शिष्यपरिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘हाजरी’ या सांगितीक कार्यक्रमाचे!
प्रसिद्ध तबलावादक शंकर कुंभार यांनी हडपसरमधील विठ्ठल तुपे ऑडिटोरियमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुंभार यांच्या शिष्यांचे एकल तबलावादन झाले. तर अथर्व तुपे याचे चौघडावादन झाले.
मुख्य मैफलीची सुरुवात तबलावादक शंकर कुंभार आणि सुप्रसिद्ध पखवाजवादक पं. प्रताप पाटील यांच्यातील तबला-पखवाज जुगलबंदीने झाली. पं. प्रताप पाटील यांनी पं. भवानीशंकर रचित ‘शिवतांडव’ सादर केले. त्यानंतर दोन्ही कलाकारांनी १६ मात्रांचा चरण आणि उस्ताद अल्लारखा यांची रचना सादर केली. संतोष घंटे यांनी लेहरा साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. डॉ. धनंजय दैठणकर यांचे संतूरवादन झाले. त्यांनी राग बागेश्री सादर केला. त्यात त्यांनी आलाप, जोड, झाला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना शंकर कुंभार (तबला), कुणाल पाटील (पखवाज) यांनी समर्पक साथसंगत केली.
शंकर कुंभार यांनी उस्ताद अल्लारखा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणींना उजाळा देत गुरूंकडून मिळालेले मार्गदर्शन आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘हाजरी’ या मैफलीचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
पं. डॉ. धनंजय दैठणकर यांनीही आठवणींचा पट उलगडताना उस्ताद अल्लारखा यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन याविषयी रसिकांना सांगितले.

