सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांचा सन्मान
पुणे : स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वत्याग करणारे पराक्रमी सेनाधिकारी आपल्या कायम स्मरणात रहावे आणि नागरिकांनी सैनिकांसोबत कृतज्ञतेने सर्व सण उत्सव साजरे करावे, या उद्देशाने सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने विजयादशमी निमित्त, पराक्रमी सेनाधिकारी निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (AVSM, PVSM) यांचा सपत्नीक निवासी सन्मान करण्यात आला.
बाणेर येथील पॅराडाईज को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नाईक यांच्या निवासस्थानी ह्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष मिलिंद काळे, कोड लॅब्जचे अध्यक्ष सचिन संघई, उद्योजक शिवाजी भागवत, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ आदी उपस्थित होते. किरण पाटोळे, राजाभाऊ महाडिक, शेखर कोरडे, योगिनी पाळंदे, कल्याणी सराफ,अमर लांडे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. पुणेरी पगडी, महावस्त्र, श्री गणेशाची मूर्ती असलेली सन्मानचिन्ह, मिठाई असे सन्मानाचे स्वरूप होते.
मिलिंद काळे म्हणाले, सैनिकांप्रमाणे वागण्याची आज समाजाला गरज आहे. मागील २० वर्षात जनमानसांत अनेक बदल झाले आहेत. यापूर्वी शिक्षकांनी शिस्त सांगावी आणि आदर्श निर्माण करावा, अशी परिस्थिती होती. मात्र, आता पुढील पिढीसाठी अनुकरणीय असे भारतीय सैनिक आणि सेनाधिकारी आदर्श आहेत. वार्षिक सण उत्सव सैनिकांसोबत साजरे करून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आदर भावना व्यक्त करायला हवी.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कार्य सुरु आहे. सामान्य नागरिक सैनिकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्या करिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. सीमारेषा आणि युद्धभूमीचा अभ्यास करताना सैनिक मित्र परिवारातील सदस्यांना भूमी आणि मातृभूमी यामधील अनुभूती आली, त्यामुळे सेनाधिकारी सन्मानासारखे अनेक उपक्रम आजही निरंतरपणे सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी देखील युद्धातील निवडक प्रसंग उपस्थितांना सांगितले. यावेळी नाईक यांच्या घराच्या दारावर तोरण लावत, रंगावली देखील रेखाटण्यात आली. तसेच सनई चौघड्यांचे मंगल वादन देखील झाले.

