पुणे- फुलंब्री तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या नापिकीला कंटाळून बाबरा येथील एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
बाबरा येथील युवा शेतकरी गणेश महादू पवार (२४) यांनी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रोजी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. गट नं. ४९ येथे ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने त्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस यासारखी पिके करपून गेली होती. पेरणीसाठी घेतलेले कर्ज, बियाणे, खताचे पैसे फेडायचे कसे? या विवंचनेत गणेश मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता, असे गावकऱ्यांनी सांगितले.
गणेश हा घरचा करता मुलगा होता. त्याच्या जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बाबरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
फुलंब्री तालुक्यात यावर्षी अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. शेतमालाला भाव नाही आणि वर दुष्काळ, त्यामुळे तरुण शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ बाबरा व परिसरातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी आणि दुष्काळी अनुदान तात्काळ द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. गणेश पवार कुटुंब हे अल्पभूधारक असून शासनाने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

