मानवी मूल्ये जपण्याची जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापकांची –ज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव यांचे मत ;
पुणे : महिलांसोबत विविध क्षेत्रांत काम करताना त्यांच्या बुद्धिमत्तेचा, दूरदृष्टीचा आणि नियोजन कौशल्याचा अनुभव आला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम असून, नियोजन आणि अंमलबजावणीतही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. उद्योग क्षेत्रातील संबंध केवळ व्यावसायिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता त्यात मानवी नातेसंबंध आणि संवेदनशीलता जपली पाहिजे. मानवी मूल्ये जपण्याची जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव यांनी केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे विविध क्षेत्रांतील ५० महिला मानव संसाधन व्यवस्थापिकांचा प्रदीप भार्गव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
प्रदीप भार्गव म्हणाले, आयुष्यात विविध महिलांसोबत काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजच्या काळात अनेक गोष्टी व्यवहारकेंद्रित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मानव संसाधन व्यवस्थापकांची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. संस्थेतील मानवी मूल्यांचे जतन करणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी व संवेदनशीलता टिकवून ठेवणे हे मानव संसाधन विभागाचे महत्त्वाचे काम आहे. कंपन्या सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत विविध उपक्रम राबवतात; मात्र स्वतःच्या कर्मचाऱ्यांप्रतीही तितकीच संवेदनशीलता दाखवून त्यांच्या गरजांचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाशी न्याय्य वागणे आणि संस्थेत मानवी संबंधांना महत्त्व देणे आवश्यक आहे.
भरत अग्रवाल म्हणाले, ज्ञान, संपत्ती आणि शक्ती या तिन्ही गुणांच्या माध्यमातून देवीचे वर्णन केले जाते. महिलाही या तिन्ही गुणांचे प्रतीक आहेत. केवळ मंदिरातच नव्हे, तर कार्यालयात आणि घरीही त्यांचा सन्मान व्हायला हवा. महिला मानव संसाधन व्यवस्थापिकांचा सन्मान करण्याची संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आसावरी येवतेकर, ज्योत्स्ना तिवारी, अमृता पाटील, एकता वाघमारे, अक्षता जैन, नेहा गुजराल, प्रियंका काणे, प्रीती देशमुख, ईशा जानी, प्रीती गोबाडे, राखी सागरे, किरण खापरे, प्रणिता काबरा, शरयू कुलकर्णी, पारिद्धी जैन, अर्पणा जोशी, प्रज्ञा मते, ईशा विसपुते, मोनिका काटकर, अपेक्षा सुपेकर, सायली पुजारी, निधी धांजु, वैशाली दराडे, वैशाली कुलकर्णी, प्रिया शर्मा, हर्षा पाटील, कविता बोरा, पूजा काबरा, आराधना भाले, आदिती आठवले, प्राजक्ता बी., सोनल शेठ, सोनिका सचदेव, निकिता तेलगु, काशिश मुतकुरे, डॉ. प्रतिमा शेणॉय, मेघना कुलकर्णी, योगिता तोडकर, सोनाली चिंतामणी, सिद्धी गुपचुप, वैष्णवी गौतम, अंजली बदाम, स्वाती खंदारे, नूतन भावेकर, डॉ. श्वेता काटे, मयुरी भागवत, सारिका क्षीरसागर, कीर्ती दातार, रिचा देवरे, मोक्षा ओसवाल, पृथा निबंधे, सोनाली गोळेकर, सायली कोकाटे, सुचेता कालावार, श्रद्धा पाटील, यशोधना, अपर्णा चौगुले, डॉ. संजीवनी पांडे आणि प्रीती साखे आदींचा सन्मान करण्यात आला. अनुष्का कांकरिया यांनी सूत्रसंचालन केले.

