पुणे, दि.१६: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांनी दिले.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह आयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी
ओमप्रकाश दिवटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
एसआयआर कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, दावे निकाली काढण्याचा कालावधी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीच्या वेळी अशा तीन टप्प्यांत मतदार यादी निरीक्षकांकडून विभागातील प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार श्रीमती तेली – उगले यांनी आज पुणे जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी एसआयआरच्या कामाला गती द्यावी. सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यावर कटाक्षाने सनियंत्रण ठेवावे. हे काम काळजीपूर्वक व वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. विशेषतः मतदार नोंदींमधील त्रुटी (ॲनॉमली) दूर करणे आणि मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील नावे वगळताना पुरावे काळजीपूर्वक तपासावेत, असे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच १७, १८ व २४, २५ ऑक्टोबर रोजी शनिवार रविवारी मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त काम या शिबिरांमध्ये पूर्ण करावे असे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मत अवैध ठरणार नाही यासाठी जनजागृती करा- विभागीय आयुक्त
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघातील विधान परिषद निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीत मत वैध ठरतील यासाठी ‘मतदान कसे करावे, याबाबतचे भित्तीपत्रके छापून सर्व मतदान केंद्र, समाजमाध्यमे यावर जनजागृती करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निरीक्षक शीतल तेली- उगले यांनी यावेळी दिल्या.
तसेच पदवीधर व शिक्षकांच्या मतदार यादीची तपासणी करून त्यातील दुबार नावे शोधावीत. व संबंधित मतदाराला त्याचे नाव दोन ठिकाणी असल्याबाबत कळवावे व संबंधित मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे याबाबत माहिती लेखी स्वरूपात घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

