पुणे, दि.१४: जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेश जारी होईपर्यंत लागू राहणार असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

