पुणे – अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल आवाज, लोकप्रिय नट, रमणीय चित्रीकरण स्थळे…असा माहौल रसिकांच्या मनात जागविणारी जादू ‘मॅजिक ऑफ बर्मन्स’ या कार्यक्रमातून सोमवारी रसिकांनी अनुभवली.
३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या दुसऱ्या माळेची सायंकाळ श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन, या पितापुत्रांच्या जोडीने गाजवलेल्या गीतांमुळे स्मरणीय ठरली. कृष्णधवल काळापासून ते रंगीत चित्रपटांच्या काळापर्यंतचा सांगीतिक प्रवासही यातून पुढे आला.
प्रारंभी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या तैलचित्रास महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मधू कांबीकर यांच्या ‘शापित’ चित्रपटातील गाजलेल्या भूमिकेचा उल्लेख करून आबा बागुल म्हणाले की, ‘शापित’ ते ‘एक होता विदूषक’ हा त्यांचा चित्रपट प्रवास थक्क करणारा होता. अतिशय प्रभावी अभिनय करणाऱ्या मधु कांबीकर या उत्तम लावणी सम्राज्ञी होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका गुणी कलावंतास मुकलो. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, विलास रत्नपारखी आदि उपस्थित होते.
कला, संस्कृती आणि संगीताचा संगम साधणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या पुढाकाराने मॅजिक ऑफ बर्मन्स हा कार्यक्रम पंचम क्रिएशन्स आणि लिओ डिझाईन्स यांनी प्रस्तुत केला. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन आणि नंतर त्यांचे सुपुत्र राहुल देव बर्मन, यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा गीतांची निर्मिती करून, खरोखर एक जादूभरे वातावरण निर्माण केले. त्या वातावरणाचा पुनःप्रत्यय मॅजिक आफ बर्मन्स या सादरीकरणातून रसिकांनी सोमवारी घेतला.
प्यार करनेवाले, दिवाना मुझसा नही, तुमने मुझे देखा, ख्बाव हो तुम या कोयी हकीकत, ये दिल ना होता बेचारा, जब हम जवा होंगे, घुंघटा, गुलाबी आखें, पूछो ना कैसे मैने रैन बिताई, नाचे मन मोरा मगन, होटों पें ऐसी बात, बचना ऐ हसीनों, मेहबूबा मेहबूबा, लेकर हम दिवाना दिल, ये जवानी है दिवानी, कर ले प्यार करले, काटा लगा, यम्मा यम्मा, कैसे कब कहा, दिन ढल जाये, तेरे मेरे सपने, ये शाम मस्तानी, प्यार दिवाना होता है, रूप तेरा मस्ताना, लडका हाये अल्ला, अरे यार मेरी तुम भी हो गजब, चूडी नही ये मेरा दिल है….अशी सदाबहार गाणी मकरंद पाटणकर, रूपाली आनंद आणि डॉ. विवेक पांडे यांनी सादर केली. चिंतन मोढा (की बोर्ड), अभिजीत भदे (ड्रम्स), अमन सय्यद (की बोर्ड), प्रथमेश मोरे (सॅक्सोफोन), हर्षद गनबोटे (तबला, ढोलक), राहुल भाटे (गिटार), आनंद घोगरे (ऑक्टोपॅड) यांनी अनुरूप साथसंगत केली. आकाश सोळंकी यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना माधुरी जोशी आणि आनंद घोगरे यांची होती.
कलाकारांचे सत्कार आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, जयवंत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, घनश्याम सावंत आदी उपस्थित होते.

