पुणे, दि.१०: महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय मतदान होणे महत्त्वाचे असून, ही जबाबदारी प्रत्येक निवडणूक अधिकारी,कर्मचाऱ्याने दक्षतेने पार पाडावी, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सह आयुक्त तुषार ठोंबरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, मतपत्रिकेचा वापर, मतदारांची ओळख पडताळणी आणि निवडणुकविषयक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, मतदान साहित्याची तपासणी, मतदारांच्या ओळखीचे पुरावे, मतदार नोंदवहीतील नोंदी, पसंतीक्रमाने मतदान करण्याची पद्धत तसेच मतपेटी हाताळण्याबाबत श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे फरकही स्पष्ट करण्यात आले. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी मतदारांना योग्य सूचना देणे, अनधिकृत ओळखपत्रांबाबत सतर्क राहणे, संशयास्पद बाबींची त्वरित नोंद घेणे आणि निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला. तसेच मतदारांच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे आणि सर्व उमेदवारांना समान वागणूक देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि मतदानानंतर करावयाची कार्यवाही यांचीही माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी पाचही जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह पुणे विभागातील उपविभागीय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

