पृथ्वीची पर्यावरणीय प्रकृती बिघडली; ती अतिदक्षता विभागातपर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर; हवामान बदल भविष्याचा नव्हे, आजचा प्रश्न

Date:

पुणे-हवामान बदल हा भविष्यातील प्रश्न नसून आजच्या पिढीसमोरील गंभीर संकट आहे. पृथ्वीची पर्यावरणीय प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असून तिची अवस्था अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णासारखी झाली आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते समजून घेण्याची गरज असताना विकासाच्या जुनाट संकल्पनांमुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण द्यायचे असेल तर विकासाची दिशा आणि जीवनशैली बदलणे अपरिहार्य आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ, लेखक व पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड येथे महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘पोरेके पर्यावरण’ या विषयावर देऊळगावकर यांचे व्याख्यान झाले. सुमारे ६० स्लाइडच्या सादरीकरणातून त्यांनी हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, शहरीकरण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकास याबाबत विवेचन केले. तुषार गांधी अध्यक्षस्थानी होते.

देऊळगावकर म्हणाले, ‘‘यंत्रयुगाच्या काळात निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. निसर्ग ही केवळ वापरण्याची वस्तू नसून त्यामध्ये असंख्य सजीवांचे परस्परावलंबी जग आहे. एका झाडावर सुमारे ३०० ते ४०० प्रकारचे कीटक अवलंबून असतात. ही साखळी समजून घेतल्याशिवाय पर्यावरण संवर्धन शक्य नाही.’’

२०२५ मध्ये देशात तब्बल ३२१ दिवस वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली. मात्र, आपली धोरणे प्रामुख्याने पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांभोवती केंद्रित असल्याने पर्यावरणासाठी दीर्घकालीन नियोजन होत नाही. हवामान बदलामुळे तापमानवाढीचा वेग वाढत असून यंत्रयुगाच्या तुलनेत जागतिक तापमानात सुमारे दीड अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरी आणि ग्रामीण भागातील हवेतील सूक्ष्म धूलिकण मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. २.५ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म धूलिकण शरीरात खोलवर प्रवेश करून गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. प्रदूषणाची किंमत आपण थेट आपल्या आरोग्यातून चुकवत आहोत. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना वाचवण्यासाठी आजच पर्यावरणीय धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे देऊळगावकर यांनी नमूद केले.

मोठ्या कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रदूषण करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी कार्बन करासारख्या उपायांचा विचार करावा. कचरा व्यवस्थापनातही जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. झाडांपासून तयार होणाऱ्या कागदी वस्तूंचा अनावश्यक वापर कमी करून पुनर्वापरावर भर द्यावा. शहराचा आकार वाढत जाईल तसा कचरा वाढतो; त्यामुळे ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करण्याच्या उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.

शहरे मोटारकेंद्री नव्हे तर माणूसकेंद्री असली पाहिजेत. परदेशातील अनेक शहरांमध्ये पादचारी, सार्वजनिक वाहतूक, उद्याने आणि पर्यावरणाला प्राधान्य दिले जात असताना आपण मोटारींना केंद्रस्थानी ठेवून शहरांची रचना करीत आहोत. वास्तुकला ही केवळ बांधकामाची पद्धत नसून ती समाजाच्या मूल्यांची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे बांधकामात पर्यावरणपूरक आणि कलात्मक पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. जंगलतोड झालेल्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. यंदाच्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत जागरूक होते. त्यांच्या विचारांमधील साधेपणा, गरजेपुरता वापर आणि निसर्गाशी सुसंवाद ही तत्त्वे आजच्या पर्यावरणीय संकटावर उपाय ठरू शकतात. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर ज्ञानशाखांचा एकत्रित विचार करताना गांधीजींच्या विचारांची गरज आहे. विकासाच्या संकल्पना बदलून निसर्गाचा ऱ्हास न करता प्रगती साधण्याची दिशा स्वीकारली पाहिजे, असे देऊळगावकर यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोप करताना महात्मा गांधी यांचे पणतू व महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त तुषार गांधी म्हणाले, ‘‘पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी सरकार आणि उद्योग जबाबदार आहेत, असे आपण सहज म्हणतो. मात्र, आपल्या स्वतःच्या वर्तनाची जबाबदारीही आपण स्वीकारली पाहिजे. मनुष्यनिर्मित कचरा ही आजची प्रमुख समस्या आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे.’’

‘‘महात्मा गांधींकडून केवळ प्रेरणा घेण्यापेक्षा मोहनदास गांधींसारखे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीडीपीचा अर्थ आता ‘ग्रेटेस्ट डिस्ट्रक्शन ऑफ द प्लॅनेट’ असा वाटू लागला आहे. पृथ्वीवरील संसाधने लोकांच्या गरजा पूर्ण करू शकतात; मात्र माणसांच्या गरजा अमर्याद होत चालल्या आहेत. नागरिक आणि प्रजा यातील फरकही समाजाने समजून घेतला पाहिजे,’’ असे तुषार गांधी यांनी सांगितले.

या वेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, रमेश आढाव, प्रवीण सप्तर्षी यांच्यासह आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, रवींद्र धनक, प्रसाद गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सूरज कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रवीण सप्तर्षी यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांधी भवनमध्ये वैचारिक कवितांतून सामाजिक प्रश्नांवर प्रहार

‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये..?’ कार्यक्रमात...

“हे सामूहिक नव्हे, तर तुमचं अपयश”; रुपाली पाटील ठोंबरेंचा सुनील तटकरेंवर घणाघात

पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीत उघड नाराजी; अनिकेत...

श्री चतुःशृंगी देवीचा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पुणे, ता. ७ ऑक्टोबर : श्री चतुःशृंगी...