पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीत उघड नाराजी; अनिकेत तटकरेंच्या आमदारकीवरूनही सवाल
पुणे : विधान परिषद निवडणुकीतील पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही जागा पक्षाला न मिळणे हे “सामूहिक अपयश” असल्याचे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट प्रत्युत्तर देत, “हे सामूहिक अपयश नाही, हे तुमचं अपयश आहे,” असा घणाघात केला.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील जागावाटपात राष्ट्रवादीला ही जागा मिळवता आली नाही. याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी पक्ष या जागेसाठी कमी पडल्याचे मान्य केले होते.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तटकरे यांच्यावर टीका केली. “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत तुम्ही हे सामूहिक अपयश असल्याचे म्हणत असाल, तर ते योग्य नाही. हे तुमचं अपयश आहे,” असे त्या म्हणाल्या.
अनिकेत तटकरेंच्या आमदारकीवरही निशाणा
ठोंबरे यांनी तटकरे यांच्या पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचाही मुद्दा उपस्थित केला. अजित पवार कोणालाही रिपीट देण्याच्या भूमिकेत नसताना अनिकेत तटकरे यांच्यासाठी आमदारकी खेचून आणल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच पक्षाच्या वाट्याला आलेल्या पालकमंत्रीपदाचाही त्यासाठी त्याग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “मुलाला निवडून आणणे हे तुमचे यश आणि पक्षाला जागा मिळाली नाही तर त्याचे अपयश सामूहिक, असे चालणार नाही,” असे त्या म्हणाल्या. हे आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले असून तटकरे यांची यावर स्वतंत्र प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
“सुनेत्रा पवारांना अपयशात ओढू नका”
रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करत त्यांच्या कामकाजाचे समर्थन केले. पक्षातील निर्णयांची जबाबदारी निश्चित करताना सोयीस्करपणे “सामूहिक अपयश” म्हणू नये, असे त्यांनी म्हटले.
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली. प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या मागण्या आणि राजकीय गणिते होती. या प्रक्रियेत पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेली, तर शिक्षक मतदारसंघातही महायुतीतील तणाव आणि बंडखोरीची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर
पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीला न मिळाल्याने पक्षातील अस्वस्थता आता उघडपणे समोर येत आहे. तटकरे यांनी याला “सामूहिक अपयश” म्हटले असताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्याची जबाबदारी थेट तटकरे यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अधिक उघड झाला आहे.

