जो आपल्या विचारांचा नाही त्याची कत्तल कराही भावना लोकशाही पुढील आव्हान-माधव भंडारी

Date:

‘’लोकशाही समोरील आव्हाने’’ या विषयावरील परिसंवादात लोकशाही बद्दल आशावाद

पुणे-आपल्याला जे मानवत नाही तो आवाज बंद केला जातो, जो आपल्या विचारांचा नाही त्याची कत्तल करा ही भावना हे लोकशाही पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. तुम्हाला पटेल तेच मी बोलले पाहिजे हा वैचारिक दहशतवाद आहे. पैशांमुळे लोकांचा आवाज दाबला जात असेल तर ते वाईट आहे. असे मत ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६’ अंतर्गत ‘’लोकशाही समोरील आव्हाने’’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी विकास लवांडे, प्रशांत जगताप, श्रावणी बुआ, महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त सचिव अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, प्रवीण सप्तर्षी, रमेश आढाव उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले की, आजही जनतेसमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यासाठी भांडायला कार्यकर्ता नाही. दुर्देवाने जनतेचा प्रश्न मांडणारा एकही राजकीय पक्ष आता राहिला नाही. मी निवडून आलो तेव्हा १६ हजार रुपये खर्च केले. आता तेथे ७० लाख रुपये खर्च होतो. पैशाचा वापर वाढलाय. हे सर्व असले तरी आम्ही आमचा पक्ष, विचार बदलला नाही. भारतातील जनता न बोलता योग्य निर्णय घेते. ती सुज्ञ आहे. असे आमचे मत आहे. आम्ही आमचे काम करत राहू. जनता मूर्ख आहे, विकली गेली आहे असे आम्ही कधी देखील मानणार नाही. इतर राजकीय पक्षाचे लोक आणि आम्ही एकमेकाचे विरोधक आहोत. शत्रू नाही. स्पर्धक आहोत. अशीच माझी भावना राहील.

ज्यांच्याशी मी वैचारीक भांडायचो, वाद संवाद करायचो, ते आता राहिले नाहीत. गेल्या अडीच वर्षांत माझ्या घरात पाच मृत्यू झाले. त्यामुळे मी आता सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालो आहे. मात्र मी सुरु केलेल्या प्रकल्पग्रस्त संघटनेसाठी अद्यापही काम करतोय. मी जे विचार मांडले ते वैयक्तीक माझे आहेत. असे ही भंडारी यांनी सांगितले.

विकास लवांडे म्हणाले की, फुटलेले व न फुटलेले दोन्ही उमेदवार पात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी कसा दिला याचे खुप आश्चर्य वाटते. धर्म हा घरात असावा. धर्म सत्ता राजसत्तेपेक्षा मोठी असे बोलणे हे लोकशाही साठी धोकादायक आहे. ढोंगी माणसांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत सुध्दा लोकशाही हवी. राजकारणात नितीमत्ता पाहिजे, सधनतेत परिश्रम, शिक्षणात चरित्र दिसायला हवे.

विकास लवांडे म्हणाले की, लोकशाही ही घरातून चालू होते. लोकशाही घरात असेल तर समाजात येईल. लोकशाही टिकवणे ही भारतीय नागरिकांच्या हातात आहे. आता सर्वसामान्य राजकीय कार्यकर्ता निवडणूक लढवू शकत नाही. कार्यकर्त्यांची कुचंबणा होतं आहे. मी साडेतीन हजार रुपयांत गावची सरपंच निवडणूक लढवली होती. आता ती तीन लाख रुपयांतही लढवू शकणार नाही. पूर्वी कार्यकर्ते काम करायचे. आता पेड वर्कर आहेत. आता कार्यकर्त्यांची गरज नाही.

आमदार, खासदार व पक्ष विकले जातात, फुटतात. या घटनांमुळे त्रस्त झालेले मतदार आता आम्हाला विचारतात की, मतदान तुम्हाला करू पण तुम्ही पक्ष तर बदलणार नाही ना असा प्रश्न विचारतात असे सांगून प्रशांत जगताप म्हणाले की, लोकशाहीच्या चारही स्तंभांची विश्वासार्हता नष्ट होणे हे मोठे आव्हान आहे.

प्रशांत जगताप म्हणाले की, लोकशाही पुढे पूर्वी देखील आव्हाने होती. आत्ता देखील आहे. मात्र देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहे त्यांनी लोकशाहीत साठी काय केले? लोकशाही संपुष्टात येईल अशी अवस्था या मंडळींनी केली आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

श्रावणी बुआ म्हणाल्या की, गांधी म्हणत स्वातंत्र्य हा मार्ग आहे. युवा पिढी या मार्गावर आहे. त्यामुळे गांधी कधी पराभूत होत नाही. होणार नाहीत. सर्वोदय आणि अंत्योदय शेवटच्या माणसापर्यंत लोकशाही पोहचली पाहिजे. या भावनेतून नवी पिढी कार्यरत आहे.

भारताच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेला दहशतवाद हा मोठा प्रश्न आहे. लोकशाही नागरिकामुळे टिकते. लोकांच्या मनात विवेकवाद जागवला पाहिजे. अस्मितेच्या राजकारणातून, धार्मिक विव्देषातून लोकशाहीचे खच्चीकरण होत आहे. लोकशाहीच्या जागा वाचवल्या पाहिजेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्वर राजन म्हणाले की, शेतकरी आंदोलन, विद्यार्थी वर्गाचे आंदोलन ही आशादायक बाब आहे. जनतेच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे. बदल होतोय असा विश्वास निर्माण करणारी परिस्थिती आहे.

लोकशाही मध्ये आपल्याला न आवडणारे मुद्दे ऐकून घ्यायची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. नव निर्माण आंदोलन काळात काँग्रेस मध्ये एक गट होता. ज्यांनी इंदिरा गांधी यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. नविन सरकार काळात विद्यार्थी आंदोलकांशी चर्चा करा असे कोणीच नेत्याने पंतप्रधानांना सांगितले नाही का. असा प्रश्न उपस्थित करत अन्वर राजन म्हणाले की, काँग्रेस सरकारने ज्या चुका केल्या त्यापेक्षा अधिक चुका या सरकारच्या काळात झाल्यात. या सरकारच्या काळात १५२ वेळा पेपर फुटी झाली. हे सरकार संविधानात बदल करत नाही पण त्याप्रमाणे वागतही नाही. वसुधैव कुटुंबकम म्हणायचे. आणि मानवात भेदभाव करायचा. पक्षांतर्गत लोकशाही दिसत होती. आता लोकशाहीशी खेळण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात.

मुसलमान संपले की सगळे प्रश्न सुटतील असे वातावरण तयार केले जाते आहे. आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार असणे हे मानवीय आहे. पण त्यासाठी पालकांची संमती घेतली पाहिजे असा कायदा केला जातो. याकडे अन्वर राजन यांनी लक्ष वेधले.

सायली मनोहर हीने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. युवक क्रांती दलाचे संघटक आप्पा अनारसे यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, सर्व पक्षीय विरोधक आणि सत्ताधारी यांचा हा परिसंवाद आहे. संवादातून लोकशाही झिरपते असे आम्ही मानतो. आजचे राजकारण व्देष वाढवणारे आहे. अशावेळी तरुण पिढी लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. आपल्या लोकशाहीचा पोत हा रस्त्यावरील लढ्यातून विकसित झाली आहे. सुषमा अंधारे व अक्षय कांबळे हे आंदोलन असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. सूत्रसंचालन सुरज कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजस भालेराव यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कविता जागतिक झाली आहे, कवींनी स्वतःच्या अक्षरांची उंची वाढवावी

ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण; वल्लरी प्रकाशनतर्फे ‘मालिनी’ प्रातिनिधिक...

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी हजारोंचा लाँग मार्च; लक्की मरवतहून इस्लामाबादकडे PTI समर्थकांची कूच

राजधानीत कडेकोट सुरक्षा; कंटेनर लावून प्रमुख मार्ग रोखण्याची तयारी इस्लामाबाद...

विशेष मुलं घेतायेत स्वावलंबनाचे धडे – संदीप खर्डेकर.

" विशेष मुलांना " पणत्या,कॉफी पेंटिंग, रोपं इ तयार...

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे, दि. ५ : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक...