रोहित पवारांवर निशाणा; “तुम्ही पाठवलेल्या शिष्टमंडळावरच विश्वास नाही का?” विद्यार्थ्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला, प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून आंदोलन स्थगित करण्याची भूमिका घेतली; तरीही पुण्यात आंदोलन सुरूच कसे राहिले, असा सवाल मोहोळ यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ म्हणाले की, आपण दोन दिवस प्रवासात असलो तरी पुण्यातील सर्व घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवले होते. एस. एम. जोशी पूल, अलका चौक आणि शास्त्री रस्ता येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण वैयक्तिकरित्या संपर्क साधला होता. आंदोलन सुरू होण्यापूर्वीही काही विद्यार्थी आणि प्रतिनिधींशी संवाद केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले की, विद्यार्थ्यांना लोकशाही आणि संविधानाने आंदोलनाचा अधिकार दिला आहे. न्यायासाठी विद्यार्थी आंदोलन करत असतील तर त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री स्तरावर पोहोचवण्यात आल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू राहणे समजण्यापलीकडचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
“पावणे तीन तास बैठक झाली”
रोहित पवार यांनी वेगळ्या विद्यार्थी शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या शिष्टमंडळाला जवळपास पावणे तीन तास वेळ दिला, असे मोहोळ यांनी सांगितले.
या बैठकीत विद्यार्थ्यांनी मांडलेले जवळपास सर्व मुद्दे चर्चेला घेण्यात आले आणि अनेक मुद्द्यांवर एकमत झाले, असा दावा मोहोळ यांनी केला. विद्यार्थ्यांच्या पाच प्रमुख मागण्यांवरही सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय?
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी हा विद्यार्थ्यांचा प्रमुख मुद्दा असल्याचे सांगत मोहोळ म्हणाले की, या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र एमपीएससी अध्यक्ष हे घटनात्मक पद असल्याने त्याबाबत थेट राज्य सरकार, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल निर्णय घेऊ शकत नाहीत.
या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करून पुढील प्रक्रिया करण्याचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो. तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करून तिच्या निष्कर्षांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
“वारंवार कागदपत्रांची मागणी होणार नाही”
विद्यार्थ्यांकडून वारंवार वेगवेगळी कागदपत्रे मागवली जात असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार नाही, अशी कार्यपद्धती अवलंबली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचा दावा मोहोळ यांनी केला.
सिंगल कार्ड आणि अन्य कागदपत्रांसाठी वारंवार धावपळ करावी लागू नये, यासाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑब्जेक्टिव्ह-डिस्क्रिप्टिव्हचा मुद्दा समितीकडे
परीक्षेतील ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्याही बैठकीत चर्चेला आल्या. हा विषय राधा समितीकडे विचारासाठी देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. त्यानंतर सर्व प्रतिनिधींच्या सह्यांसह एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यात बैठकीबद्दल समाधान व्यक्त करून पुण्यात परतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची भूमिका घेण्यात आली होती, असे मोहोळ यांनी सांगितले.
“मग आंदोलन थांबले का नाही?”
याच मुद्द्यावरून मोहोळ यांनी रोहित पवारांवर थेट सवाल केला.
“तुम्हीच शिष्टमंडळ पाठवले, तुम्हीच विद्यार्थी प्रतिनिधी निवडले. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आम्ही समाधानी आहोत आणि आंदोलन स्थगित करू, असे सांगितले. मग दोन-तीन तासांनंतर पुण्यात परतल्यावर आंदोलन थांबले का नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या चार दिवसांपासून आंदोलन नेमके कशासाठी, कुणासाठी आणि का सुरू आहे, याचे उत्तर आता मिळाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
“तुमच्या लोकांवर तुमचाच विश्वास नाही का?”
रोहित पवारांना उद्देशून मोहोळ म्हणाले, “तुम्ही पाठवलेल्या शिष्टमंडळावर तुमचा विश्वास नाही का? त्या विद्यार्थ्यांनी बैठक झाल्यानंतर समाधान व्यक्त केले होते. तरीही आंदोलन पुढे सुरू राहिले.”
रोहित पवार यांनी स्वतःही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.
“काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे का?”
आंदोलनात राजकीय नेत्यांच्या वाढत्या सहभागावरही मोहोळ यांनी टीका केली.
“सकाळपासून संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे नेते येतात, भाषणे करतात. त्यामुळे कधीकधी काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे का, असा प्रश्न पडतो,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, विद्यार्थ्यांच्या मूळ भावना आणि मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन
मोहोळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थेट आवाहन केले. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत संवेदनशील आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय वाटचालीत अडथळा येऊ नये, यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
“ही मुले सर्वसामान्य कुटुंबांतून आलेली आहेत. अनेकजण गरीब परिस्थितीतून संघर्ष करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मी स्वतः खेडेगावातून आलो असल्याने त्यांच्या भावना मला समजतात. त्यांच्या कष्टांना न्याय मिळाला पाहिजे,” असे मोहोळ म्हणाले.
पुण्यात एक लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचा मार्ग किती काळ सुरू ठेवायचा, याचाही विद्यार्थ्यांनी विचार करावा, असे आवाहन केले.
“तुमच्या बहुतांश मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या प्रक्रियेनुसार सोडवल्या जातील. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनीही पुढील वाटचालीचा शांतपणे विचार करावा,” असे मोहोळ यांनी शेवटी म्हटले.

