पुणे- सिंगापूरमधून ८००० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर भारत सरकारच्या मदतीने आणण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुणेकर उद्योजकाने यासंदर्भात पुढाकार घेतला असून पंतप्रधान मोदींनी होकार दर्शवल्याची माहिती दिलीय.मात्र याबाबत अध्याप अधिकृत माहिती येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितलेय .
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली असल्याचेही पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवड्याची करोना आढावा बैठक शुक्रवारऐवजी सोमवारी घेतली. या बैठकीमधील चर्चेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.
“सुधीर मेहता हे जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था अपग्रेट करण्यासाठी इतर व्यवसायिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागील वर्षभरामध्ये जवळजवळ २०० कोटी उभे केलेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मला सांगितलं की सिंगापूरमध्ये काही आरोग्य विषय साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना ८००० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर असल्याचं सांगितलं. सिंगापूर सरकारचा एक कॉर्पोस फंड आहे. जो जगातील सर्वात मोठ्या चॅरीटी फंडपैकी एक आहे. याअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहतांना ऑफर दिली की ५० टक्के रकमेमध्ये आम्ही तुम्हाला हे देतो. न्यायची व्यवस्था करा असं मेहतांना सांगण्यात आलं, अशी माहिती पाटील यांनी दिली.
यासंदर्भात मेहता यांनी पाटील यांना कळवलं असता पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहिलं. “माझ्याकडे हा विषय आला. मी मोदीजींना पत्र लिहिलं. केंद्र सरकारने विमानाने या गोष्टी आणण्याची तयारी दर्शवली आहे. कालच मोदी आणि एअर इंडियाच्या प्रमुखांचं बोलणं झालं आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून या गोष्टी एअरलिफ्ट केल्या जाणार आहेत. मेहता हे इथल्या उद्योजकांच्या माध्यमातून पैसे उभे करतायत. त्यामधून अगाऊ रक्कम दिली जाईल. मग हे भारतात आल्यानंतर त्याचं वितरण होईल,” असं पाटील यांनी स्पष्ट केलं.