पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष अजित बाबर (36) यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता कात्रज येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई आणि तीन भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या निधनानंतर जबरदस्त धक्का बसलेल्या युवकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी बाबर यांच्या कार्यालयासमोर प्रचंड गर्दी केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर अध्यक्ष म्हणून मागील चार वर्षांपासून अजित बाबर हे काम पाहत होते. त्यांनी कात्रज आणि सबंध पुणे शहरात चांगल्या प्रकारे पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिला. त्यांच्या जाण्याने पक्षातील कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या परिसरातील युवा वर्गात अजित बाबर सर्वाधिक लोकप्रिय होते . सलाम पुणे या संस्थेचे २ पुरस्कार त्यांनी मिळविले होते . त्यांच्या कामाच्या झपाट्याने होणारी त्यांची लोकप्रियता .. आता कुठे महापालिकेत सदस्य म्हणून त्यांना सन्मानाने पाठवेल असे चित्र असतानाच काळाने जणू घाला घातला .
खासदार सुप्रिया सुळे
पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, माझे सहकारी अजित बाबर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त समजले, अतिशय वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. यातून सावरण्याची शक्ती त्यांना ईश्वर देवो ही प्रार्थना..अजित बाबर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माझे सहकारी अजित बाबर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त समजले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पक्षाने एक तरुण, तडफदार कार्यकर्ता गमावल्याची हळहळ संघटनेत व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाची ध्येय-धोरणे आत्मसात करुन जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्यांपैकी बाबर एक होते. या कठीण प्रसंगात बाबर कुटुंबियांच्या दु:खात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. अजित बाबर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.