पुणे, दि. ०४ मे २०२२: गेल्या आर्थिक वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताच नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास महावितरणने पुणे परिमंडलात मोठा वेग दिला. त्याची फलश्रृती म्हणून सन २०२१-२२ या वर्षामध्ये पुणे परिमंडलामध्ये तब्बल १ लाख ८३ हजार ७८३ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १ लाख ५२ हजार ७५३ घरगूती वीजजोडण्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सन २०२०-२१ मध्ये कठोर लॉकडाऊन होता. तरीही महावितरणच्या जिगरबाज अभियंता व कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्याची सेवा दिली होती. मात्र नवीन वीजजोडण्या देण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. पहिल्या लाटेचा जोर ओसरताच नोव्हेंबर २०२० नंतर नवीन वीजजोडण्या देण्यास गती देण्यात आली व मार्च २०२१ अखेर १ लाख ९ हजार १९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२१ पर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असल्याने नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. मात्र मार्च २०२२ पर्यंत महावितरणच्या पुणे परिमंडलाने धडक कामगिरी करीत तब्बल १ लाख ८३ हजार ७८३ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
कार्यान्वित झालेल्या नवीन वीजजोडण्यांमध्ये १ लाख ५२ हजार ७५३ घरगुती, २१ हजार ३५ वाणिज्यिक, ३२७१ औद्योगिक, ५०६९ कृषी व १६५५ इतर वीजजोडण्यांचा समावेश आहे. पुणे शहरामध्ये घरगुती- ६६ हजार ८३७, वाणिज्यिक- ९६८८, औद्योगिक- ७७१, कृषी- ६१ व इतर ४६२ अशा एकूण ७७ हजार ८१९ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरगुती- ३७ हजार ६०८, वाणिज्यिक- ५१५६, औद्योगिक- ९९८, कृषी- १३२ व इतर ४९२ अशा एकूण ४४ हजार ३८६ वीजजोडण्या तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह हवेली ग्रामीणमध्ये घरगुती- ४८ हजार ३०८, वाणिज्यिक- ६१९१, औद्योगिक- १५०२, कृषी- ४८७६ व इतर ७०१ अशा एकूण ६१ हजार ५७८ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी २०२१ मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केवळ १२ ते २४ तासांमध्ये कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सीजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी युद्धपातळीवर कर्तव्य बजावले आहे. सोबतच वीजग्राहकांना सेवा देत तब्बल १ लाख ८३ हजारांवर नवीन वीजजोडण्या देण्याची कामगिरी देखील बजावली आहे.