पुणे : पुणे शहरात हेल्मेटची सक्ती नको, अशीच भाजपची भूमिका आहे. या संदर्भात शहरातील आठ आमदार आणि खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी दिली. त्याचबरोबर आंदोलनाच्या जागेवरूनच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ही सक्ती रद्द करण्याची मागणी केली.
पोलिस आयुक्तांनी शहरात हेल्मेटसक्ती लागू केली आहे. या सक्तीच्या विरोधात हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती स्थापन झाली. या समितीतर्फे आज मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सभा घेण्यात आली. महापौर दत्ता धनकवडे आणि उपमहापौर आबा बागूल यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली. त्या वेळी आमदार कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक धनंजय जाधव, शांतीलाल सुरतवाला, धीरज घाटे, समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, संदीप खर्डेकर, इक्बाल शेख, बाळासाहेब रुणवाल, सुरेश जैन आदी या वेळी उपस्थित होते.
सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक आहे. मात्र, त्याची सक्ती नसावी. विनाकारण पकडून पोलिस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हेल्मेट कंपन्यांच्या हितासाठीच हे उद्योग चालले असल्याचा आरोप या वेळी काही वक्त्यांनी केला; तर पुणेकरांनी भाजपवर शंभर टक्के विश्वास दाखविला आहे. शहरात आठ आमदार आणि एक खासदार याच पक्षाचा आहे. सत्ताही त्यांचीच आहे, असे असताना पुणेकरांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये. हेल्मेटसक्तीला विरोध केल्याबद्दल आमदार विजय काळे आणि मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन या वेळी करण्यात आले
गुरुवारी मानवी साखळी
समितीच्या वतीने डेक्कन जिमखाना ते टिळक चौक अशा मानवी साखळीचे आयोजन गुरुवार (ता. 20) सकाळी करण्यात आले आहे. या मानवी साखळीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.