पुणे : जगामध्ये आपल्या देशाची अधिकाधिक प्रगती साधायची असेल तर तरुण उद्योजक पिढी
निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे, असे मत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी
व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,येणाऱ्या काळात देशात १०० हून अधिक तरुण डीएसके तयार
झाले पाहिजेत, ज्यांनी माझ्यापेक्षा भरीव कामगिरी करायला हवी.हेच माझे स्वप्न
साकारण्यासाठी मी यापुढील काळात प्रयत्न करणार आहे.
उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित व श्याम भुर्केलिखित ‘शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके’
पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस चे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी
जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, सुधीर
गाडगीळ आणि श्याम भुर्के उपस्थित होते.
यावेळी मुजुमदार म्हणाले, डीएसके म्हणजे मोठी स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात
उतरवण्यासाठी प्रयत्नशील असणारे पुणेकर आहेत. एकाच आयुष्या मध्ये माणूस किती काम
करू शकतो याचे डीएसके एक उदाहरण आहेत. असमाधान हेच त्यांचे स्फूर्ती स्थान
असल्यामुळे त्यांचा उद्योगाचा पसारा वाढला आहे आणि त्यात यशस्वीरित्या पुढे जात आहेत
त्याच्यातील ही बाब कौतुकास्पद आहे.असेही त्यांनी नमूद केले.
गाडगीळांच्या खुमासदार प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, समाजासाठी मला अजून खूप काम
करायचे आहे. घरांच्या किंमती कमी करण्याबरोबरच गोरगरीबांसाठी, मध्यमवर्गीयांच्या घराचे
चित्र बदलायचे आहे. ग्राहकाला एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर तो भांडायला पुढे
आला पाहिजे हा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण करून देण्यात जर तुम्ही सफल झालात
तरच तुम्ही यशस्वी झालात असे समजावे.
पुस्तकातील काही गंमतीदार किस्से सांगत भुर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुवळेकर
यांनी डीएसकेंच्या व्यक्तीमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर सुधीर
गाडगीळ यांनी डीएसकेंची मुलाखत घेवून त्यांच्या आयुष्यातील गमती-जमती दिलखुलासपणे
प्रेक्षकांसमोर मांडल्या.
सुधीर गाडगीळ यांनी तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत असे तुम्हाला कधी वाटले असा प्रश्न
विचारला असता डीएसके म्हणाले, नववीमध्ये असताना मी वृत्तपत्र टाकायचो. त्यावेळी वृत्तपत्र
विकून जमा झालेली ८० रुपयांची चिल्लर ही आजही मला ६ हजार कोटी रुपयांच्या
उलाढालीपेक्षा मोठी वाटते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.