विद्यार्थी सहायक समितीचा माजी विद्यार्थी मेळावा रविवारी
पुणे : ग्रामीण भागातील हजारो मुला-मुलींना पुण्यात शिक्षण घेताना निवास-भोजन व्यवस्था पुरवत व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या रविवारी (दि. २३) आयोजित करण्यात आला आहे. माजी विद्यार्थी मंडळाने आयोजिलेला यंदाचा ३१ वा माजी विद्यार्थी मेळावा आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन परिसरात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कदम, उद्योजिका छाया रहाणे व अनिल खेतमाळीस उपस्थित राहणार आहेत.
हा मेळावा म्हणजे आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याची एक पर्वणी असते. जुन्या आठवणीत रमण्याचा क्षण असतो. आपल्या प्रियजनांची, स्नेहीजनांची ख्याली खुशाली जाणून घेण्याचा हा दिवस असतो. अगदी साठी-सत्तरीच्या दशकापासून ते ट्वेन्टी ट्वेन्टीपर्यंतच्या बॅचचे अनेकजण भेटतात; मैत्रीचा धागा दृढ करतात. यंदाचा मेळावा अहमदनगरचे माजी विद्यार्थी करताहेत. तेव्हा येत्या रविवारी (दि. २३) आपल्या लजपतराय विद्यार्थी भवनला यावे व मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी विद्यार्थी मंडळातर्फे करण्यात आले आहे.