पुण्यात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान संमेलन; ज्येष्ठ व्यंगचित्रकार लहू काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे : कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०२६चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते विजयादशमीनिमित्त मुंबईतील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव, सचिव धनराज गरड, उपाध्यक्ष अमित पापळ, उदय मोहिते, वासुदेव बोंद्रे, नीरज सबनीस, ओंकार बागवे, जयेश दळवी आदी उपस्थित होते.
संमेलन दि. २५ ते दि. २७ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. संमेलनात व्यंगचित्र कार्यशाळा, देशभरातील मराठी व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके, परिसंवाद, व्यंगचित्र दिंडी आणि पुरस्कार सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेचा व्यंगचित्रकलेतील मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यंगचित्रकार लहू काळे यांना जाहीर झाला आहे. काळे हे गेल्या २० वर्षांपासून दैनिक ॲग्रोवनमध्ये केवळ शेतकरी या विषयावर आधारित ‘चकाट्या’ हे पॉकेट कार्टून रेखाटत आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी दिली.
संमेलनाचा लोगो तरुण व्यंगचित्रकार वासुदेव बोंद्रे यांनी साकारला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे हे संमेलन बाळासाहेब ठाकरे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांना समर्पित करण्यात आले आहे.
व्यंगचित्रकलेतील कलाकार, अभ्यासक आणि रसिकांना एकत्र आणणाऱ्या या संमेलनातून मराठी व्यंगचित्रकलेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह नव्या पिढीतील व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती मनसे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांना करण्यात आली आहे.

