मुंबई– अभिनेता अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर तो म्हणाला-”पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधीही लपवले नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने विचारलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल”, असेही अक्षयने म्हटले आहे.
अक्षयचे स्पष्टीकरण
”माझ्या नागरिकत्वाबाबत बिनबुडाच्या आणि नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत हे मला समजत नाहीये. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या सात वर्षात कधीही लपवले नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या सात वर्षात कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढेच खरे आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. या गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जात आहे, हे पाहून दुःख होतंय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढेच सांगतो,” असे स्पष्टीकरण अक्षयने दिले.
नागरिकत्वाबाबत तरतुदी
विविध वृत्तांमध्ये अक्षय कुमार हा भारताचा नागरिक नसल्याचे म्हटले होते, पण जॉली एलएलबी 2 या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला पत्रकाराने नागरिकत्वाबाबात प्रश्न विचारला होता. यावर अक्षय कुमार म्हणाला, ”हे तुम्ही समजताय तसे नाहीये. हे नागरिकत्व मानद (honorary) आहे.”
भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये कोणालाही दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. एखाद्या भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचे भारतातील नागरिकत्व आपोआप रद्द केले जाते. याची तरतूद राज्यघटनेतील कलम 8 आणि नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 8 मध्येही आहे. भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार नाही, त्यासोबतच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, खासदार, आमदार, सरकारी सेवा यासाठी अपात्र ग्राह्य धरले जाते.
अक्षय कुमार नेमका कोणत्या देशाचा नागरिक?
मानद नागरिकत्व हे एखाद्या देशाकडून सन्मान म्हणून दिले जाते. मानद नागरिकत्व दिले म्हणजे सामान्य नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखादा व्यक्ती कॅनडाचा Honorary Citizenship असेल तर त्यालाही कॅनडात जाण्यासाठी व्हिजा आवश्यक असेल.
अक्षय कुमार हा Overseas Citizenship of India आहे की भारतीय नागरिक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच आरटीआयला उत्तर दिले आहे. तो Overseas Citizenship of India नसल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्ट 2017 मध्ये आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने स्पष्ट केले, की अक्षय कुमार हा भारतीय नागरिक आहे.