मुंबई,
वीज बिल भरण्यापासून ते कॉल सेंटरला तक्रार करण्यापर्यंतच्या महत्त्वपूर्ण सुविधा महावितरणने ग्राहकांसाठी
मोबाईलवर उपलब्ध करुन दिल्या असून महावितरणच्या या मोबाईल अॅपचे उद्घाटन गुरुवारी राज्याचे ऊर्जामंत्री
श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले. हे अॅप महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केले
या प्रसंगी ऊर्जा सचिव श्री. मुकेशकुमार खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओम प्रकाश गुप्ता व
इतर संचालक उपस्थित होते.
ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी महावितरणकडून सातत्याने नवनवीन उपाय योजना राबविण्यात येत
आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने मोबाईल अॅप तयार केले आहे. यात ग्राहकांना त्यांचे वीज बिल बघता
तसेच भरता येईल. मोबाईल अॅपद्वारे क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करुन ग्राहक वीजबिल भरु शकतात.
याशिवाय या अॅपमध्ये ग्राहकांना वीज सेवेबाबत तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून
तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या तक्रारीची पोच ग्राहकांना
तक्रार क्रमांकासह एसएमएसद्वारे मिळणार आहे. या अॅपद्वारे महावितरणच्या 1800-233-3435, 1800-200-3435
या टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. या अॅपमध्ये ग्राहकांना महावितरणशी संबंधित सेवांची चौकशी करता येईल
व त्याबाबत सूचनाही करता येईल. विशेष म्हणजे ग्राहकाने आपल्या मोबाईल क्रमांकावरुन एकदा या अॅपवर नोंदणी
केल्यास या ग्राहकाला परत नव्याने नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. ग्राहकांना महावितरणच्या
www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावरुन तसेच Google Play Store
वरुन हे अॅप डाऊनलोड करता येईल.