जय भोले फिल्म्स प्रॉडक्शन यांची निर्मिती असलेला 23 ऑक्टोबर 2015 रोजी प्रदर्शित ‘दगडाबाईची चाळ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी विनोदाची खास मेजवानी ठरणार आहे. जिलेबीवाला या भूमिकेत असलेला हिंदीतील अभिनेता राजपाल यादव या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटाचे निर्माते दत्तात्रय भागुजी हिंगणे आहेत. सुनील वायकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाची कथा-पटकथा स्वत: वायकर यांनीच लिहिल्याने चित्रपट नक्कीच गमतीदार आणि चांगला आशयाचा झाला आहे.
‘दगडाबाईची चाळ’ हे नाव सामान्य वाटत असले तरी यातील प्रत्येक दिवसाच्या प्रसंगानुसार घडत जाणारा विनोद प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. परळ येथील एका चाळीची मालकीण असलेली दगडाबाई आणि त्या चाळीतील भाडोत्री यांच्यावर बेतलेला हा चित्रपट असून चाळीतले नातेसंबंध दाखविण्याचाही प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
आपल्या दमदार विनोदी अभिनयाद्वारे लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या चित्रपटात दगडाबाई ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्याचजोडीला आपल्या अतरंगी विनोदी सेन्ससाठी प्रसिद्ध असलेला भूषण कडू, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर, जॉनी रावत, किशोर चौघुले संतोष चोरडिया यांनीही निरनिराळ्या व्यक्तिरेखा चित्रपटात साकारल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ‘खडूस’ व्यक्तिरेखेद्वारे अल्पावधीत लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे सुनील गोडबोले हेही या चित्रपटात असून ती चित्रपटाची जमेची बाजू ठरेल. प्रत्येक दिवसाच्या विनोदाबरोबरच दगडाबाईच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग, आर्थिक अडचणी आणि त्यावर दगडबाई कशा पद्धतीने मात करते त्याचबरोबर अचानक दगडाबाईच्या दोन पुतण्या गायब झाल्याने तिच्या अडचणीत अधिकच भर पडते. या अडचणींवर दगडाबाई मात करते की नाही ? यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
चित्रपटाचे संगीत केदार पंडित, अजय–अद्वैत यांनी केले असून गाण्यांचे बोल नचिकेत जोग यांनी लिहिले आहेत. वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, शलाका चांदवडकर आणि प्रतिभा थोरात या गायक-गायिकांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.