कराड, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील कराड येथे येत्या रविवार दिनांक 7 आक्टोबर रोजी 15 वे दिवाळी अंक संपादक अधिवेशन व स्व. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
दिवा प्रतिष्ठान, सा. कराड वैभव, आणि कराड वैभव चॅरीटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य दिवाळी अंक संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन आणि पारितोषिक वितरण समारंभ कराड एस.टी. स्टॅण्ड समोरील हॉटेल अलंकार सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे.
कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक अरूण सावळेकर, ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते आण्णासाहेब जाधव, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरत, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत हिडकल, ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
याच अधिवेशनात ‘दिवाळी अंक ‘काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये हास्यधमाल दिवाळी अंकाचे संपादक महेंद्र देशपांडे, निहार दिवाळी अंकाच्या संपादिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, गुंफण दिवाळी अंकाचे संपादक डॉ. गजानन चेणगे, मुंबईच्या नंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील वाडेकर, माजी सहायक पोलीस आयुक्त विनायकराव जाधव, बदलापूरच्या ग्रंथसखाचे अध्यक्ष श्याम जोशी हे सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्राचार्य गणपतराव कणसे हे करणार आहेत.
दिवसभर चालणा-या या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये, कराड वैभव चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. धनंजय सिंहासने, प्रा.सुहास चवहाण, प्रा. गणपतराव कणसे यांनी केले आहे. अधिवेशनास आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर, वेदातंश्रीचे संपादक सुनील गायकवाड, साहित्य संपदाचे संपादक शिवाजीराव यादव, मारुती विश्वास, विजय रणदिवे, अजित पडवळ, उल्हास पाटकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.