पुणे – अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी सध्या पिण्यासाठी ठेवलेले खडकवासला धरणातील 80 दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. “”दरवर्षी खडकवासला धरणातून 36 तास नदीमध्ये पाणी सोडले जाते. हे पाणी सुमारे 0.15 टीएमसी इतके सोडण्यात येत होते. या वर्षी धरणे निम्मीच भरली असल्यामुळे 80 घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. ते सुद्धा फक्त 12 तासच नदीत पाणी सोडले जाणार आहे. सकाळी आठ ते रात्री 11.30 पर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या पातळीत साडेतीन ते चार फूट वाढ होणार आहे.‘‘ हे पाणी शहराला एक दिवसासाठी पुरेल इतके असणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी खराडी येथे अडविले जाणार असून ते पाणी मुंढवा जॅकवेलद्वारे पुन्हा शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींसह सर्व राजकीय पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
पिण्याव्यतिरिक्त धरणातून पाणी सोडण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेची आवश्यकता आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा झाली असून, विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी राज्य सरकराकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हे पाणी सोडण्यात येणार आहे.