श्री.बालाजी मंदीर नारायण पेठ महिला मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुकीत मोफत (मिनरल) जलसेवा आणि लिंबू सरबत वाटप सेवा
पुणे:
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्री.बालाजी मंदीर, नारायण पेठ महिला मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक 27 सप्टेंबर 2015 रोजी विजय थिएटर, लक्ष्मी रोड, नारायण पेठ येथे दुपारी एक वाजता ‘नि:शुल्क मोफत जलसेवा आणि लिंबू सरबत वाटप सेवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शारदा भागीरथ राठी यांनी दिली.
या उपक्रमाचे उद्घाटन आमदार गिरीष बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा.अनिल शिरोळे, माजी आमदार विनायक निम्हण, मोहन जोशी, नगरसेवक हेमंत रासने, दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, मंडळाचे सर्व पदाधिकारी, माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी आदी मान्यवर, महिलावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमातंर्गत गणेशभक्त, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत शुद्ध फिल्टर मिनरल पाण्याचे वाटप तसेच मसाला लिंबू सरबताचे वाटप करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.