पुणे – आंदोलन करणाऱ्यांचे राज्यात पूर्ण बहुमतातील सरकार आले आहे. त्यांनी चौकशी, तपास करावा आणि वस्तुस्थिती पुढे आणावी. हिवाळी अधिवेशनात कापूस, सोयाबीन, उसाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी असेल, असे सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार आणि हत्यांच्या घटनांबाबत अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
पुणे जिल्हा सहकारी गटसचिव संघटना आयोजित मेळाव्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या विरोधी पक्षावर दाव्याबाबत पवार म्हणाले, “”विरोधी पक्षनेता कोणाचा हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवितात. कॉंग्रेस, राष्ट्रवादी त्यांची भूमिका मांडतील. त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे निर्णय घेतील. पंधरा वर्ष आम्ही सत्तेत होतो, आता विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने मांडणार आहोत. भाजप, शिवसेनेने विरोधात असताना सरकारची बदनामी केली, आरोप करून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. आता चौकशी, तपास करा आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणा.‘‘
हिवाळी अधिवेशनापूर्वी चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांनी बोलाविलेल्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकणार नाही. याचा पवार यांनी निषेध केला. “”विरोधी पक्षात असताना ते चहापानावर बहिष्कार टाकत. पण आम्ही कधीही विरोधी पक्षाला कमी लेखले नाही. पंतप्रधानांनी संध्याकाळी बैठक बोलाविली असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यास हरकत नव्हती. सत्तेची धुंद आणि मस्ती आली असेल तर नागरीक ती लक्षात ठेवतील आणि योग्य वेळ आली की योग्य बटण दाबून जागा दाखवतील,‘‘ असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार हेच अधिवेशनातील आमचे प्रमुख मुद्दे असतील, असे नमूद करीत पवार म्हणाले, “”शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारेच आता सत्तेवर आले आहेत. त्यांनीच आता कापूस, उसाला योग्य भाव द्यावा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकरी नुकसान भरपाई द्यावी, बिसलेरी पाण्याच्या बाटलीपेक्षा दुधाला कमी भाव मिळत असल्यानेच दूध उत्पादक शेतकरी ते रस्त्यावर ओतून देण्याचे कृत्य करीत आहे. याचा विचार सरकारने करावा, अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.‘‘