मुंबई- .मॅगी नूडल्सवर देशभरात घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अथॉरिटी ऑफ इंडियाचे (एफएसएसएआय) मॅगीवरील बंदी आदेश बेकायदा असल्याचे कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटले आहे. मॅगीवरील बंदी उठवताच नेस्लेचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले आहेत.
मॅगी नूडल्समध्ये शिशाचं प्रमाण अधिक असल्यामुळं ती आरोग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) व फुड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियानं (एफएसएसएआय) मॅगीवर बंदी घातली होती. या बंदी निर्णयाला ‘नेस्ले’नं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व न्या. वर्गीस कुलाबावाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली असता खंडपीठानं काही अटींसह ही बंदी उठविण्याचा निर्णय दिला. मॅगीवर बंदी घालताना अन्न सुरक्षा नियामक यंत्रणांनी नैसर्गिक न्यायतत्त्वांचा भंग केला आहे. बंदी घालण्याआधी संबंधित कंपनीला ‘कारणं दाखवा’ नोटीस बजावून म्हणणं मांडण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळं हा बंदी आदेश जुलमी स्वरुपाचा आहे,’ असं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. मॅगीवरील बंदी उठवत असलो तरी लोकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. म्हणूनच मॅगीच्या एकूण ९ उत्पादनांचे प्रत्येक पाच नमुने जयपूर, मोहाली व हैदराबाद येथील प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. सहा आठवड्यांच्या आत याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. या नमुन्यांमध्ये शिसाचं प्रमाण योग्य असल्याचं आढळलं तरच कंपनीला मॅगीचं उत्पादन आणि विक्री करता येईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळं बंदी उठली असली तरी आणखी सहा आठवडे मॅगीची विक्री बंदच राहणार आहे.
मॅगी वरील बंदी उठली … नेस्ले चे शेअर वधारले …
Date: