पुणे
ईशान्य भारतातील लेह-लढाख म्हणजे हिमालयातील पर्वतराजीने वेढलेला रम्य प्रदेश. या पर्वतराजीच्या सौंदर्याचे वर्णन जेवढे करता येईल तेवढे ते कमीच असेल. निसर्गाने जणू काही खास प्रयत्न करून या सृष्टीसौंदर्याची उधळण केली आहे असेच या पर्वतराजीकडे पाहिल्यावर वाटते. सृष्टीसौंदर्याने नटलेल्या या पर्वतरांगा छायाचित्रांच्या रूपाने प्रत्यक्ष पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना चालून आली आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांच्या कैमेऱ्यातून टिपलेल्या या ”मिस्टिक माऊन्टन्स” च्या छायाचित्रांचे प्रदर्शन नववर्षाच्या प्रारंभीच म्हणजे दि. २ जानेवारीपासून पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
श्री मिलिंद ढेरे यांनी लेह-लढाख भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील पर्वतराजींच्या ‘कुशीत’ पहुडलेल्या निसर्गाचे मनोहारी रूप आपल्या कैमेऱ्यात चित्रबद्ध केले असून त्यांच्या या छायाचित्र प्रदर्शनात विविध रंगातील पर्वतांच्या छटा पहावयास मिळतील. सूर्याची पिवळसर किरणे अंगावर झेलणारे पर्वत, धुक्याची शाल लपेटलेले पर्वत , गडद निळी दुलई परिधान केलेले पर्वत अशा विविध रंगाच्या पर्वतराजीबरोबरच सोबतीला तेथील अन्य निसर्गाची बोलकी छायाचित्रेही पहावयास मिळणार आहेत.
दि. दोन ते पाच जानेवारी दरम्यान, कोरेगाव पार्क भागातील ‘मोनालिसा कलाग्राम’ ( पिंगळे फार्म्स, साऊथ मेन रोड ) येथे भरविण्यात आलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पिनैकल ग्रुप, पुणे चे सीएमडी श्री गजेंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी दि. दोन ते पाच जानेवारी दरम्यान रोज सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहील.
‘मिस्टिक माऊन्टन्स’ : मिलिंद ढेरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
Date: