राजगुरूनगर : स्वतंत्र विदर्भाच्या नावाखाली आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे अखंड महाराष्ट्राचे लचके तोडण्याची स्वप्ने पाहणार्या दिल्लीतील मोगलशाही सरकारचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे दिला.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने मित्र म्हणून ज्यांना २५ वर्षे सांभाळले, प्रसंगी सर्व सुख दु:खात साथ दिली, त्याच मित्राने केवळ स्वार्थासाठी सहकारी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. ही निवडणूक म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाची लढाई असून भगव्याची ताकद काय आहे, ती या निवडणुकीत राज्यातील जनता दिल्लीत बसलेल्यांना दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले, युतीची बोलणी करण्यासाठी मी सेनेच्या इतर नेत्यांसमवेत भाजपच्या नेत्यांकडे गेलो होतो. परंतु चोवीस वर्षांचा हा मुलगा आमच्याशी काय बोलणी करणार? अशी भाजपच्या लोकांनी माझी संभावना केली. परंतु या निवडणुकीत युवा सेनेची ताकद काय आहे. ती तुम्हाला तरुणांच्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतो, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, या आघाडी सरकारने तीन वेळा महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेस व राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. खासदार आढळराव म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आ. दिलीप मोहितेंच्या गुंडगिरी व दहशतीला तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. यावेळी विजया शिंदे, दत्ता कंद यांची भाषणे झाले.
याप्रसंगी संपर्कनेते मनोहर गायखे, पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे, राजू जवळेकर, खेड बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, अतुल देशमुख, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका अध्यक्ष गणेश सांडभोर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमृता गुरव, तालुका अधिकारी दत्ता कंद, नाना टाकळकर सह शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणार्या दिल्लीतील मोगलशाही सरकारला धडा शिकवा — आदित्य ठाकरे
Date: