बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव– 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत थाटात व प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. नाट्यदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन केले.
बेळगावकर रसिक मंडळी व महाराष्ट्रातून आलेले रंगकर्मी यांच्या उपस्थितीत स्वागत करून नाट्यसंमेलनाचा पडदा उघडला गेला. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दांडी मारली. दरम्यान, मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यसंमेलन ठिकाणी निदर्शने करीत घोषणाबाजी करून गोंधळ घातला. बेळगावचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे असे सांगत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काही वेळ उद्घाटन समारंभा लांबला. तरीही तब्बल 60 वर्षांनंतर बेळगावात नाट्य संमेलन होत असल्याने नाट्यरसिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचे दिसून आले.