नागपूर : शहरातील गांधीसागर, फुटाळा, अंबाझरी, नाईक तलाव, सोनेगाव, सक्करदरा या तलावांतील प्रदूषित होऊ नये यादृष्टीने पुढील वर्षी तलावांमध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असून यंदा महापालिकेने विसर्जनासाठी जी व्यवस्था केली आहेत, त्याच व्यवस्थेत विसर्जन करावे. तसेच पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
गणेश विसर्जनासंदर्भात बिजलीनगर या वीज मंडळाच्या विश्रामगृहावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकरराव देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, ना.गो. गाणार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी बिजलीनगर येथील विश्रामगृहात गणेशउत्सव विसर्जन व्यवस्था, एलईडी बल्ब वाटप नियोजन, जिजामातानगर येथील शारदा हाऊसिंग सोसायटी येथील लेआऊट धारकाने एनआयटीची जागा आपली जागा म्हणून विकल्यामुळे तेथील नागरिकांसोबत चर्चा, आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
शहरातील सर्व तलावांवर गणेश विसर्जनसाठी आता वेळेवर निर्बंध घालणे शक्य नसल्यामुळे एक वर्ष आधीच शहरातील तलावांमध्ये गणेश विसर्जन करता येणार नाही, अशी सूचना मंडळांना देण्यात येणार आहे. बैठकीत आयुक्तांनी मनपाची विसर्जनाची व्यवस्था सांगितली. ते म्हणाले, 118 कृत्रिम टाके तयार करण्यात आले आहेत. फुटाळा तलावात सर्वाधिक गणपती विसर्जित केले जातात.
आमदार श्री. खोपडे यांनी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सौजन्यांची वागणूक द्यावी, गणेश उत्सव आणि दुर्गा उत्सवादरम्यान कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याबद्दल सतर्क असावे. विसर्जनासाठी पोलिसांकडून लवकर परवानगी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार सुधाकर देशमुख यांनीही उपयुक्त सूचना केल्या. यावर पालकमंत्री म्हणाले, पोलिसांनी नागरिकांशी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सौजन्याने वागण्याच्या सूचना दिल्या. तसेच मंडळाच्या तारखानुसार त्यांना विसर्जनाची परवानगी द्यावी. 27 ला रात्री 12 वाजेपर्यंत आणि 28 व 29 सप्टेंबर रात्री 10 वाजेपर्यंत गणेश विसर्जनास परवानगी देण्यात यावी. तसेच पोलिसांप्रमाणे विसर्जनाच्या ठिकाणी मनपाच्या सर्व सहायक आयुक्तांनीही रात्री 12 वाजेपर्यंत थांबावे.
विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवा
गणेश विसर्जनाच्या मार्गावर असलेल्या खड्ड्यांकडे आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, ना.गो.गाणार आदींनी लक्ष वेधले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणेश विसर्जनाच्या मार्गावर असलेले खड्डे मनपाने विसर्जनापूर्वी बुजवावे असे निर्देश दिले.
खड्ड्यांमुळे विसर्जनासाठी जाणाऱ्या मूर्ती भंगण्याची शक्यता लक्षात घेता हे खड्डे बुजवणे आवश्यक आहे. तसेच खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. शहरातील खड्डे मनपानेच बुजवावे, असे पालकमंत्री म्हणाले.
आठ दिवसात शहरातील सर्व लाईट सुरु करा
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे रात्री बंद असतात, याकडे लक्ष वेधत पालकमंत्री यांनी बंद पथदिव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या आठ दिवसात शहरातील सर्व दिवे सुरु करावेत, असे निर्देश दिले.
एलईडी लाईटच्या काऊंटरचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते करावे
शहरात वितरीत करण्यात येणाऱ्या एलईडी लाईटच्या वितरण केंद्राचे उद्घाटन संबंधित क्षेत्राच्या आमदारांच्या हस्ते करावे, असे निर्देश एलईडी लाईट वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विधानसभा क्षेत्रनिहाय विक्री केंद्र सुरु करावे त्याची माहिती संबंधित आमदारांना द्यावी. त्या भागाच्या आमदार व नगरसेवकाच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करावे. जे केंद्र सुरु आहेत त्याची माहितीही आमदारांना द्या, वितरण केंद्राचे कार्यक्रम घ्या, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
तरोडी जमीन विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
कामठी तालुक्यातील खरबीजवळ असलेल्या तरोडी येथील नासुप्रच्या सव्वा आठ एकर जागेचे 283 जणांना भूखंड पाडून विक्री केल्याबद्दल नासुप्रचे अधिकारी, विक्री करुन देणारा रजिस्ट्रार, ग्रामपंचायतीचा सरपंच, सचिव आणि विकणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश श्री. बावनकुळे यांनी दिले.
नासुप्रची जागा असतानाही विक्री करणाऱ्याने 283 जणांची फसवणूक केली आहे. या जागेवर सध्या 75 गरीब कुटुंब घरे बांधून राहत असून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही जागा नासुप्रची असल्याचे सिद्ध झाले आहे. या जागेचा सात बारा नासुप्रच्या नावे असून 12 एप्रिल 1965 मध्येच ही जागा नासुप्रला देण्यात आली होती. या जागेवर नासुप्रची मालकी असल्याचा अवॉर्डही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे.

