मराठी मालिका, कार्यक्रम आणि सोहळ्यांद्वारे मराठी प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती देणारी वाहिनी म्हणजे झी मराठी. गेल्या दिड दशकाहून अधिक काळाच्या या प्रवासात झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन देत त्यांच्या आवडी जपल्या आणि नवीन आवडीही निर्माण केल्या. अनेक यशोशिखरे गाठत मैलाचे दगड रचत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध करण्याचं काम झी मराठीने अव्यहातपणे केलंय. झी मराठीच्या याच यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय ‘लय भारी’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरने. मागील आठवड्यात २५ जानेवारीला झी मराठीवरून ‘लय भारी’ प्रसारीत झाला आणि त्याने एक नवा विक्रम रचला. गेल्या सात वर्षांमध्ये हिंदी आणि मराठी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि अधिक प्रेक्षकांनी बघितलेला चित्रपट अशी नोंद ‘लय भारी’च्या नावावर झाली आहे. आकडेवारीच्या किंवा टीआरपीच्या भाषेत सांगायचं झाल्यास १८८९८० जीटीव्हीटी (Gross Television Viewers in Thousand)आणि ५७२७ टीव्हीटी (Television Viewers in Thousand) कमावत या चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे लय भारीने हिंदी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या ‘थ्री इडियट्स’, ‘बॉडीगार्ड’, ‘सिंघम’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या प्रसारणाच्या आकडीवारीचे विक्रमही मोडीत काढले आहेत. महाराष्ट्रात केबल आणि सेट टॉप बॉक्स वापरणा-या ग्राहकांपैकी सुमारे सव्वा कोटी प्रेक्षकांनी ‘लय भारी’चा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर बघितला हे विशेष.
मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत मराठी चित्रपटांना ख-या अर्थाने मोठं स्वप्न दाखवलं.. बॉलिवुडमधला मराठमोळा स्टार रितेश देशमुखने लय भारीमधून मराठीत पदार्पण केलं आणि मराठीला ख-या अर्थाने ग्लॅमरस स्टार मिळाला. चांगली कथा, दमदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमुल्य, अचूक दिग्दर्शन, श्रवणीय संगीत यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अॅक्शनपॅक्ड कथा आणि दमदार संवादामुळे हा चित्रपट लोकप्रिय झालाच शिवाय यातील गाण्यांनी विशेषतः “माऊली माऊली” या गीताने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. बॉक्स ऑफिसवर तब्बल चाळीस कोटींची कमाई करत लय भारीने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मोठ्या पडद्यावर लय भारीला जे यश आणि प्रेम मिळालं त्याची पुनरावृत्ती छोट्या पडद्यावरही बघायला मिळाली.
मागील अनेक वर्षांपासून मराठी वाहिन्यांमध्ये आपलं वर्चस्व निर्विवादपणे गाजवत झी मराठीने आपलं अग्रस्थान कायम राखलं आहे. या वाहिनीवरील मालिकांना आणि विविध सोहळ्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांसोबत असलेली ही बांधिलकी जपत झी मराठीने मनोरंजनाची अनेक दालनं उघडली. या वाहिनीवरून जे प्रसारीत होईल ते अभिरूचीसंपन्न आणि दर्जेदार असेल याची काळजीही वाहिनीने घेतली. मागच्या काही महिन्यांमध्ये प्रसारीत झालेल्या ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यात फॅंड्रीच्या प्रसारणाच्या वेळी तर सामाजिक बांधीलकी जपत “जाणीव झाली बदल हवा” सारखा उपक्रम राबवत अनेक गरजू संस्थांना मदतीचा हातही दिला. ‘लय भारी’ च्या वर्ल्ड टिव्ही प्रिमीयरसाठीही नियोजनबद्ध मार्केटींग आणि योग्य प्रसिद्धीतंत्राची पुरेपुर जोड देत झी मराठीने यशाचा हा नवा विक्रम रचला.