पुणे : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कुशल उपक्रमांतर्गत प्रशिक्षित टिकम सिंग आणि परशुराम नायक हे दोन कामगार
न्यूझीलंड येथे होत असलेल्या ‘ओशनिया’ या जागतिक विभागीय कौशल्य स्पर्धेसाठी शुक्रवारी (ता. १० एप्रिल) रवाना
होत आहेत. या स्पर्धेतील भिंत-फरशीकाम आणि वीटकाम (वॉल अॅन्ड फ्लोअर टायलिंग व ब्रिक लेईंग) या प्रकारात
होणाऱ्या स्पर्धेत ते सहभागी होतील. त्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेतही
ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘कुशल’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रॉफ यांनी सांगितले, की विविध क्षेत्रांतील युवा कामगारांचे कौशल्य आजमावण्यासाठी ही स्पर्धा विविध देशांत दर
दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. विविध देशांतील कुशल कामगार त्यात सहभागी होतात.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) प्रथमच बांधकाम तंत्रज्ञानातील या प्रकारासाठीच्या स्पर्धेसाठी
हा संघ पाठवण्यात येत आहे. त्याच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य स्पर्धा आयोजित करण्याच्या
जबाबादारीचा मान ‘कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’ला मिळाला. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश आदी विविध राज्यांतील
कामगारांनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील कठीण फे-यांमधून या दोन जणांची निवड करण्यात आली. या
दोघांसोबत ‘कुशल’च्या सुकाणू समितीचे सदस्य कविश थकवानी आणि मदन ठोंबरे न्यूझीलंडला जाणार आहेत.
‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले, की हा संघ न्यूझीलंड आणि ब्राझिलला जात आहे, ही
‘क्रेडाई पुणे मेट्रो’साठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या या ‘कुशल’ उपक्रमास नुकताच
२०१४-१५ चा ‘ई गव्हर्नन्स’साठीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘विकासासाठी माहिती-संवाद तंत्रज्ञानाचा
(आयसीटी) प्रभावी वापर करणारी अशासकीय संस्था (एनजीओ)’ म्हणून भारत सरकारने या पुरस्काराने ‘कुशल’ला
अहमदाबाद (गुजरात) येथील सोहळ्यात सन्मानित केले. क्वालालंपूर (मलेशिया) येथे २५ मार्च २०१५ रोजी
झालेल्या सोहळ्यात ‘अंतर्गत संवाद आणि विकासासाठी उत्कृष्ट प्रशिक्षण कार्यक्रम राबवणारी अशासकीय संस्था
(एनजीओ)’ या प्रकारांतर्गत ‘द गोल्डन ग्लोब टायगर्स समिट अॅवार्ड २०१५’ने सन्मानित होण्याचा मानही ‘कुशल’ने
मिळवला आहे.
‘कुशल’चे विधी, मनुष्यबळ व प्रशासकीय सचिव समीर बेलवलकर यांनी सांगितले, की ‘कुशल’तर्फे २०१२ पासून
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जात आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या
अधिकृत माहितीनुसार ‘कुशल’ने आतापर्यंत २० हजारांहून अधिक कामगारांना प्रशिक्षित करून उल्लेखनीय यश
संपादन केले आहे.