आजचं युग हे शिक्षणाचं व विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. कॉम्पुटरच्या युगात जन्मलेली हल्लीची मुलं विलक्षण बुद्धीमत्तेची आहेतच,पण त्यांचे पालकही शिक्षणाच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. म्हणूनच त्यांच्या उच्चशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करताना कोणतिही तडजोड करणं त्यांना पसंत नाही.
मुलांच्या करियरची अवास्तव काळजी करणाऱ्या अशाच एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी म्हणजे शिवसाई एण्टरटेन्मेंट निर्मित चित्रपट‘ते दोन दिवस’.विदर्भातील झाडीपट्टी नाट्यचळवळीतील अभिनेता-दिग्दर्शक देवेन्द्र दोडके यांनी दिग्दर्शक म्हणून तसंच नागपुरातील नाट्यकर्मींनीया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. मुंबई-पुणे ही चित्रपट निर्मितीची केंद्रबिंदू मानली जात असताना नागपूरच्या रंगकर्मीनी संपूर्ण चित्रपट नागपूरात चित्रीत करून मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला हा स्तुत्य प्रयत्न आहे.
‘ते दोन दिवस’ या नावातच एक उत्सुकता आणि गूढ दडलेलं आहे. दोन मुलांचे करियर सुखासुखी घडत असतानाच रत्नपारखी कुटुंबाशी नियती असा काही खेळ खेळते की या कुटुंबावर एक विचीत्र आभाळ कोसळंत. मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी ओढावलेल्या संकटातून मार्ग काढताना नियतीच्या कात्रीत सापडलेले ते कुटुंब आयुष्यातील‘ते’दोन दिवस कसे घालवतात याचे भावस्पर्शीचित्रण म्हणजेच ‘ते दोन दिवस’हा चित्रपट.
मोहन जोशी, अलका कुबल, अरुण नलावडे, विलास उजवणे या दिग्गज कलाकारांसोबत रुपाली कोंडेवार-मोरे, देवेंद्र दोडके आणि बाल कलाकार चिन्मय देशकर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. नवतारका प्रसिद्धी आयलवार व संजीत धुरी या नव्या चेहऱ्यांनी ते दोन दिवस या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.या सिनेमाची निर्मिती रुपाली कोंडेवार-मोरे, संजय वाढई, देवेन्द्र बेलनकर आणि सोमेश्वर बालपांडे यांची असूनकथा देवेन्द्र बेलनकर यांची आहे. संवाद सोमेश्वर बालपांडे यांचे, तर पटकथा–गीत लेखन, दिग्दर्शन देवेंद्र दोडके यांचे आहे. संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांचे संगीत अत्यंत श्रवणीय असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, श्रुती चौधरी, अंकीत टकले यांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. कला दिग्दर्शन नाना मिसाळ, अनुप मेंढे यांचे तर नृत्यदिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी छायालेखन केले असून संकलन पंकज सपकाळे यांचे आहे. वेशभूषाकार पूजा पिंपळकर असूनसदाशिव चव्हाण निर्मिती प्रमुख आहेत.एस टी व्ही – पिकल एण्टरटेनमेंट संयुक्तरीत्या सिनेमा वितरण करीत आहेत.
अती महत्त्वाकांक्षी पालकांची नियतीने घेतलेली परिक्षा आणि त्यांच्या भावभावनांचीहृदयस्पर्शी कथा प्रत्येक आईवडिलांनी मुलांसह आवर्जून पाहवी, असा हा सिनेमा 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.