पुणे -आज पुणे जिल्ह्यात स्फोटाच्या 2 घटना घडल्या यात एकाचा मृत्यू झाला .एक घटना कोंढव्यातील भंगारच्या दुकानात तर दुसरी नारायण गाव येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीवर घडली
कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशिन चौकाजवळ मरळनगरमध्ये भंगारच्या दुकानात जुन्या तोफगोळ्याच्या स्फोटात अस्लम निजामुद्दीन चौधरी (वय 20, रा. कोंढवा, मूळ उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या दुकानात आणखी एक जिवंत तोफगोळा सापडला. तर नारायणगाव जवळील नंबरवाडी येथील एका शेतकर्याच्या दारात दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला आहे.कोंढव्यातील घटनेसंदर्भात असे सांगण्यात येते कि , अस्लमचे आजोबा असीम मोहंमद चौधरी (वय 60) व चुलतभाऊ इस्माईल मुस्तफा चौधरी (वय 18) हे जखमी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून असीम यांचा भंगाराचा एकत्रित व्यवसाय आहे. अस्लम हा दहा किलोच्या वजनाच्या मापाने तोफगोळ्याचे मागील कवच काढत होता. त्या वेळी अचानक स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर छर्रे लागल्यामुळे दोघांच्या डोळ्यांस इजा झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्फोटानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रकाश मुत्त्याळ, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक सुनील तांबे, बॉंबशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नारायणगाव येथील घटना सकाळीनऊच्या सुमारास घडली. शेतकऱ्याच्या दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. दुचाकी सुरु करत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर सापडले असल्यामुळे नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवीदास बबन काळे (रा. नंबरवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. काळे यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी घरासमोर लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. आज सकाळी काळे नऊच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते. त्यावेळी दुचाकी सुरु करण्यास गेले असता गाडी सुरु करताना जिलेटीन कांड्या व डिटोनेटरचा स्फोट झाला. या घटनेत काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायणगावचे पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करीत असताना त्यांना जिलेंटीन कांड्या व डिटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे हा स्फोट वैयक्तिक कारणातून वैमनस्यातून घातपात करण्यासाठी केला असल्याचे समजते .