मुंबई -गडकरींनी केंद्रात राहाण्यालाच पसंती दिली असली तरी, विदर्भातील अनेक आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.विदर्भातून भाजपचे ४५आमदार आहेत. त्यातील४०जणांनी गडकरींना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे. त्याच बरोबर पाच आमदारांनी त्यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.दरम्यान गडकरी यांची पक्षातील ज्येष्ठता मुख्यमंत्रीपदासाठी आडवी येत असल्याचे बोलले जाते , मोदी आणि शहा यांना या ज्येष्ठतेचाच आक्षेप असावा असेही बोलले जाते .
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे २७ऑक्टोबरला निश्चित होण्याची शक्यता आहे.वृत्तसंस्थाच्या बातमीनुसार भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर२८ऑक्टोबरला शपथविधी सोहळा होणार आहे. दिवाळीचे चार दिवस झाल्यानंतर२७ तारखेला नेता निवडीची औपचारिकता पारपाडली जाईल. विधिमंडळ पक्षाचा नेता हा नागपूरमधील आणि ब्राम्हण समाजाचाच असेल हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, हा नेता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस असेल की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान नितीन गडकरी म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस माझे सहकारी आहेत. आम्ही दोघे एकाच पक्षाचे आणि शहराचे आहोत. आमच्या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. माध्यमांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. मी आधीच स्पष्ट केले आहे, की मी दिल्लीत आनंदी आहे, मला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या पक्षाची संसदीय समिती, पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. राहिला प्रश्न माझा, तर मी कोणत्याच स्पर्धेत नाही. आमच्या पक्षाच्या काही लोकांची इच्छा आहे, की या पदावर माझी वर्णी लागावी, पण मी पक्षाच्या आदेशाचे पालन करेल.
दरम्यान, दुसरीकडे राज्यात भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावरच सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे दिल्लीहून रिकाम्या हाताने परतले होते अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र दिल्लीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली होती, अशी माहिती स्वतः सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. एवढेच नव्हे तर, सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यातील मंत्रिपदांबाबतही प्राथमिक पातळीवर चर्चा झाली होती, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेनेने कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काहींच्या ज्येष्ठतेचा मोदी -शहांना अडसर ? विदर्भातील ४० आमदारांना हवेत गडकरी-मुख्यमंत्री
Date: