लहानग्यांचा रंगरेषेतून पर्यावरणाचा संदेश चित्रकला स्पर्धेत 92 मुलांनी घेतला भाग
पुणे:
‘रेग्युलर ड्रॉईंग संस्था’ पुणेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 92 मुलांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अभिनव कलामहाविद्यालयाचे प्राचार्य गजराज चव्हाण होते. अशी माहिती स्पर्धेच्या संयोजक आणि संस्थेच्या संचालिका शैला सिन्नरकर यांनी दिली.
रविवारी ही स्पर्धा पत्रकारनगर हॉल, कामायनी शेजारी, गोखलेनगर येथे संपन्न झाली.‘ग्रीन इंडिया’, ‘क्लिन इंडिया’, ‘सेव्ह इंडिया’ या विषयांवर आधारित या स्पर्धेद्वारे पर्यावरण जनजागृती करण्यात आली. यावेळी ‘युनिव्हर्ट फाऊंडेशन ऑफ आर्ट अॅण्ड एनव्हायरमेंटल रिसर्च’ या संस्थेचे मधुसुदन सहा, स्पर्धेच्या संयोजक आणि ‘रेग्युलर ड्रॉईंग संस्थेच्या संचालिका शैला सिन्नरकर उपस्थित होते.
‘सहभागी स्पर्धकास संस्थेतर्फे दोन झाडे वाढदिवसाची भेट म्हणून दिली जाणार आहेत. त्यामधील एक झाड मुलांनी स्वत:च्या परिसरात लावायचे व दुसरे झाड जवळपासच्या मोकळ्या परिसरात अथवा टेकडीवर जावून लावावे असा उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यातुन ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देखील स्पर्धेद्वारे दिला गेला.’ असे संस्थेच्या संचालिका शैला सिन्नरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गजराज चव्हाण म्हणाले, ‘चित्र काढताना नुसते चित्र न काढता, चित्राचा विषय आणि तुमची कल्पना त्यातून दिसली पाहिजे. मी आजपर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या पण ‘झाडे लावा’ हा संदेश देवून वाढदिवसासाठी झाडे देणारी संकल्पना मला खूप आवडली. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. तुम्ही जेव्हा चित्र काढता तेव्हा तुमच्या रंगसंगतीवरून तुमचा स्वाभवही समजतो. चित्रकलेमध्ये जर करिअर करायचे असेल, तर कष्ट घेण्याची तयारी हवी. या क्षेत्रात देखील अनेक विषयांच्या शाखा आहेत. मेहनत घेतल्यास यश हे नक्कीच मिळते.’