33 वर्षीय करोनाबाधिताची व्यथा
पुणे : शहरात अवघ्या 33 वर्षीय करोनाबाधित युवकाला तब्बल आठ तास उपचारासाठी बेड न मिळाल्याने उपचारास दिरंगाई झाली. अखेर रात्री उशीरा बेड मिळाला पण तोपर्यंत करोनाने त्याच्या शरीरात गंभीर रूपधारण केल्याने बुधवारी सायकांळी या युवकाने अखेरचा श्वास घेतला.मात्र, या प्रकारामुळे करोनाच्या रूग्णांसाठी बेड उपलब्ध असल्याचा डिगोंरा पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाचा फोल पणा उघड झाला आहे.
धायरी भागात राहणाऱ्या या 33 वर्षीय युवकाला मागील आठवडयात करोना सदृश लक्षणे होती. त्यामुळे फॅमिली डॉक्टर कडे तपासणी करून हा रूग़्ण घरीच थांबून होता. मात्र, मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. सुदैवाने त्याच्या कुटूंबियांना ऑक्सिजनची सुविधा असलेली ऍम्बुलन्स मिळाली.
त्यात, ऑक्सिजन लावून त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी दुपारी दोन वाजता धायरी सोडली त्यानंतर सिंहगड् रस्त्यावरील दोन हॉस्पीटल मध्ये चौकशी करून ते रूग्णाला घेऊन शहरातील जवळपास सर्व मोठया हॉस्पीटलमध्ये गेले. त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास ते नवी पेठेतील एका मोठया रूग्णालयातही गेले.
मात्र, तिथेही त्यांना बेड नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेले नातेवाईक या युवकासह ऍम्बुलन्स घेऊन टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या समोरच रस्त्यावर ठाण मांडून बसले. आधीच बेड मिळत नव्हता, तसेच ऍम्बुलन्स मधील ऑक्सिजनही केवळ 20 टक्केच शिल्लक होता. त्यावेळी चौकात असलेल्या पोलिसांनी त्यांना बेड मिळवून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला.
अखेर रात्री दहाच्या सुमारास त्यांना विश्रांतवाडी येथे एका खासगी रूग्णालयात बेड मिळाला. मात्र, तो पर्यंत या रूग्णाच्या उपचारास तब्बल 10 तास उशीर झालेला होता. मात्र, आज दुपारी या युवकाची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.
ऑनलाईनला शहरात दाखविले 40 बेड
दरम्यान, या प्रकाराची माहीती रात्री नऊच्या सुमारास मिळाल्यानंतर युवकाच्या नातेवाईकांसह, हेल्परायडर्स या संघटनेचे सदस्य आणि महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्वत: शहरातील बेडची ऑनलाईन तपासणी केली. त्यावेळी शहरात ऑक्सिजनची सुविधा असलेले 40 बेड शिल्लक असल्याची माहीती विभागीय आयुक्तांच्या डॅशबोर्डवर दाखवत होते.मात्र, त्या ठिकाणी फोन केला असता रूग्णाला पाठवू नका असे सांगण्यात येत होते. त्यामुळे हा डॅश बोर्ड जाळायचा का असा सवाल या रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.