पुणे: पुणे स्थित ‘आर्य संगीत प्रसारक मंडळ’ आणि भोपाळ मधील ‘धृपद संस्थान’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिला वहिला ‘महिला मृदंग महोत्सव’ पुण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे. ‘पखावाज पर्व’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, हा ३ दिवसीय महोत्सव शुक्रवार, दि. १८ डिसेंबर ते रविवार, दि. २० डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्रौ १० या वेळेत सवाई गंधर्व स्मारक, शिवाजी नगर, पुणे येथे रंगणार आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर हे या महोत्सवाचे मुख्य अतिथी असतील. हा महोत्सव नि:शुल्क असून तो सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खुला असेल. सदर माहिती ‘धृपद संस्थान गुरुकुल’चे विश्वस्त आणि पखावज गुरु पं. अखिलेश गुंदेचा यांनी आज रोजी दिली.
या महोत्सवात युवा महिला कलाकार प्रामुख्याने सादरीकरण करतील. ज्यामध्ये सुप्रसिद्ध पखवाज वादक गोविंद भिलारे यांच्या शिष्या श्रेया भिलारे, तनुजा गाडिगांवकर, पं. रवी शंकर उपाध्याय यांच्या सुपुत्री आणि शिष्या महिमा उपाध्याय, पं. कालिदासपंत आगले यांच्या सुपुत्री आणि शिष्या श्रीमती चित्रांगना आगले रेशवाल, पुण्याचे पं. माणिक मुंडे यांच्या सुपुत्री आणि शिष्या प्रेरणा मुंडे, मुंबईचे पं. देवदास शेजवाल यांच्या सुपुत्री आणि शिष्या गार्गी शेजवाल, कै. पं. वसंतराव घोरपडकर आणि पं. अखिलेश गुंदेचा यांचे शिष्यत्व लाभलेल्या अनुजा बोरुडे यांचा समावेश असेल.
याशिवाय महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नामांकित धृपद गायक गुंदेचा बंधू अर्थातच पं. रमाकांत व पं. उमाकांत गुंदेचा आणि सुप्रसिद्ध ख्याल गायक श्रीनिवास जोशी यांचे धृपद आणि ख्याल गायन होईल. तसेच ‘संगम – धृपद व ख्याल संवाद’ या संवादात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येईल.
या महोत्सवास उस्ताद फारुख लतीफ खान हे सारंगीवर साथ करतील. तर संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर, उमेश पुरोहित, संतोष घंटे, प्राजक्ता रावराणे आणि ऋषीशंकर उपाध्याय हे साथ करतील. तालवाद्यांचा सुरेख संगम साधणार हा महोत्सव रसिक प्रेक्षकांना नक्कीच एक नवीन अनुभूती देऊन जाईल यात शंका नाही.