पुणे- नगरसेवक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध स्तरांवरून शक्य तिथे कोविड केअर सेंटर उभारली गेली आणि ती व्यवस्थित चालविली तर प्रशासनावरील ताण कमीहोऊन रुग्णांना उपचारासाठी शहरात करावी लागणारी वणवण थांबेल असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
नगरसेवक महेश वाबळे यांच्या विशेष प्रयत्नातून भारती विद्यापीठ, त्रिमूर्ती चौकातील सिद्धीविनायक कोविड केअर सेंटरचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महापौर मोहोळ बोलत होते.
कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तसेच खासगी वैद्यकीय संस्था कोविड सेंटर उभारणी साठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना बाधितांच्या उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. कोरोना रुग्णांवर आवश्यक उपचार करण्यासाठी तात्काळ यंत्रणा उभारण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक महेश वाबळे यांनी भारती विद्यापीठ येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील ईच्छापूर्ती गणपती मंदिरा समोरील वसुंधरा गर्ल्स होस्टेल या खासगी इमारतीमध्ये कोव्हिड सेंटर उभारण्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू केली, अल्पावधीतच आवश्यक बाबींची पूर्तता केली. परवाना विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी मनिषा नाईक यांच्या परवानगी नंतर आज महापौरांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला.
सिद्धीविनायक कोविड केअर सेंटर उभारणीमध्ये संस्थापक डॉ. भूषण लाळगे, डॉ. अजित डेंगळे, डॉ. अक्षय देशमुख, डॉ.ओंकार सहाणे, डॉ.शाबाज शेख यांचे मोलाचे योगदान आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक भोसले, योगेश शेलार, संतोष जाधव उपस्थित होते. या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी ३० आँक्सीजन बेड आणि ३० आयसोलेशन बेड उपलब्ध होणार असल्याने खरे तर स्थानिक नागरिकांचाच अधिक लाभ होणार आहे, असे मत नगरसेवक महेश वाबळे यांनी व्यक्त केले.