पुणे: ब्रॅक्ट्स ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’चे (व्हीआयआयटी) ‘सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी’शी (एसएसपीयू) संलग्न स्वायत्त संस्था म्हणून कुलगुरु प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच औपचारिक उद्घाटन झाले.
‘व्हीआयआयटी’च्या प्राचार्य डॉ. (सौ.) बिलावरी करकरे यांनी कुलगुरु व अन्य मान्यवरांचे स्वागत करुन त्यांना संस्थेचा आणि तिच्या कौतुकास्पद प्रगतीचा संक्षिप्त परिचय करुन दिला. पंख फुटलेल्या अवस्थेपासून या संस्थेने स्वायत्त संस्था बनण्यापर्यंत मजल मारली असून आयएसओ प्रमाणन, एनबीए व एनएसीसी मान्यता, विविध सर्वेक्षणांत आघाडीचे मानांकन प्राप्त करत ती झपाट्याने प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. यासंदर्भात डॉ. करकरे म्हणाल्या, “व्हीआयआयटीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असून विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, माजी विद्यार्थी, उद्योग भागीदार आणि संशोधन सहयोगी आदी घटकांच्या योगदानामुळेच हे स्वप्न साकार झाले आहे. आता आमची संस्था फलिताधारित शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाशी आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत असा स्वतःचा अभ्यासक्रम आखण्यास सक्षम झाली आहे.”
‘व्हीआयआयटी’चे उद्घाटन करताना कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले, “शैक्षणिक स्वायत्ततेबरोबरच मोठी जबाबदारी आणि आव्हानेही पेलावी लागतात. व्हीआयआयटीने अध्ययन संस्कृती आणि संशोधनाच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. या संस्थेत स्वायत्तता यशस्वी करुन दाखवण्याचे सुप्त सामर्थ्य असून अशाच प्रकारे स्वायत्ततेची आकांक्षा असणाऱ्या इतर संस्थांसाठी ती आदर्श ठरेल. अध्यापन व अध्ययनातील सर्वोत्तम प्रथांची देवाण-घेवाण व आविष्कार घडवण्याचे ध्येय ठेवल्याने ‘व्हीआयआयटी’ ही देशभरातील शिक्षणाचा दर्जा अद्ययावत करण्यासाठी मोलाचा ठेवा बनली आहे.” उद्योगांच्या व विद्यार्थ्यांच्या गरजांशी सुसंगत असा आंतरशाखीय अभ्यासक्रम बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ‘व्हीआयआयटी’ झपाट्याने झेपावत आपले ध्येय भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘डिजीटल इंडिया’ पुढाकारांशी जुळवून घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संस्थेचे बी.टेक व एम.टेक शिक्षणक्रम जागतिक गरजांशी सुसंगत अभ्यासक्रमावर आधारित असून शैक्षणिक उत्कृष्टता, नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांत त्यामुळे जागतिक व स्थानिक अशा दोन्ही प्रश्नांबाबत जाणीव निर्माण होते आणि समस्यांवर अभिनव उत्तरे शोधून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार कौशल्ये वापरण्यासही त्यामुळे उत्तेजन मिळते. हा अभ्यासक्रम भावी पिढीतील नेते घडवण्यासाठी उद्योग आणि नामवंत संस्थांतील तज्ज्ञांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी खास विकसित केलेल्या अभ्यासाच्या अन्य पैलूंनी मजबूत आहे. असा मजबूत सह-अभ्यासात्मक शिक्षणक्रम नेतृत्व कौशल्य वापरण्यासाठी संधी पुरवतो आणि शैक्षणिक मागण्यांचे क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, उद्योजकीय कौशल्ये व समाज सेवा यांच्याशी संतुलन साधत सर्वांगीण विकास घडवतो.
कुलगुरु डॉ. करमळकर यांनी यावेळी ‘व्हीआयआयटी’च्या प्रगतीत सहयोग देणाऱ्या व्यक्तींचा प्रातिनिधीक सत्कार केला व त्यात उद्योग भागीदार अभियंते नीलकंठ जोशी, संशोधन सहयोगी व ‘टीआयएफआर’चे शास्त्रज्ञ डॉ. शशिकांत दुग्गड, ‘व्हीआयआयटी’चे माजी विद्यार्थी रघुनाथ शुक्ल, हेमंत दुसाने व आदर्श केदारी यांना गौरवले.
‘ब्रॅक्ट’च्या विश्वस्त सौ. अमिता आगरवाल यांनी एसपीपीयूचे कुलसचिव डॉ. ए. डी. शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. अशोक चव्हाण, तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. ए. एस. अभ्यंकर व उप कुलसचिव सौ. एस. एस. अत्रे यांचा सत्कार केला.
‘एसपीपीयू’, ‘इस्रो’, ‘इन्कॉइस’ आदी संस्थांकडून मिळालेल्या अर्थसाह्याने ‘व्हीआयआयटी’ने हाती घेतलेल्या संशोधन मोहिमेबाबत उद्घाटनाआधी कुलगुरुंना माहिती देण्यात आली. या पुढाकारामुळे उद्योगाभिमुख, बहूशाखीय प्रकल्पांची संख्या वाढली असून त्यातूनच उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तंत्रकौशल्यांनी संस्थेतील विद्यार्थी सुसज्ज झाले आहेत.
विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक भरत आगरवाल उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवला. त्यात ते म्हणतात, “तंत्रशिक्षणातील उत्कृष्टतेचे ध्येय बाळगून व्हीआयआयटीची स्थापना करण्यात आली आहे. व्यावसायिकता व जबाबदार नागरिकत्वाच्या चैतन्याने परिपूर्ण असे सक्षम अभियंते विकसित करावेत, ज्यांच्यात उद्योग, उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रांच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांना प्रतिसाद देण्याचे कौशल्य असेल आणि देशाच्या भवितव्यात योगदानासाठी सक्षम बनण्यासाठी त्यांच्यात नैतिकता व व्यावसायिक जबाबदारीची तीव्र जाणीव असावी, हे संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. व्हीआयआयटी आपल्या स्वायत्त अभ्यासक्रमात राबवू पाहात असलेल्या अनुभवात्मक शिक्षण (एक्स्पिरियन्शियल लर्निंग) या संकल्पनेनेच येथील शैक्षणिक प्रयत्नांचे अद्वितीयत्व व वेगळेपण स्पष्ट झाले आहे. संस्थेचे व्यवस्थापन तिच्या ध्येयधोरणांशी उत्तम समरस असून हे ध्येयधोरण आपल्या कॅम्पसबाहेरही ज्ञात व्हावे, यासाठी मदत करत आहे.”
स्वायत्त संस्था बनणे हा ‘व्हीआयआयटी’च्या मुकूटातील आणखी एक मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन ‘ब्रॅक्ट’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. बिपीन सुळे म्हणाले, “यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्टता प्राप्त करण्याबाबत शिकवले जाईलच, परंतु अभ्यासक्रमेतर व सह-अभ्यासक्रमात्मक उपक्रमांत सहभागी करुन त्यांचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास घडवण्यावरही भर दिला जाईल. हीच जीवन कौशल्ये विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज बनवतील.”