- कसब्यात इतिहास घडविणार
- कसबा मतदार संघात पाणी वाटपाचे नियोजन नाही. धरणे भरली असताना पाणी कपात सुरू आहे. नागरिक रोज समस्यांचा सामना करीत असताना भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार खुशाल आहेत. त्यांना नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. कसब्यातील जनता इतिहास घडविण्यास उत्सुक आहे असे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले.
पुणे : महापालिकेतील गटनेते आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन शुक्रवारी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर गणेश कला क्रीडा रंगमंचपर्यत प्रचार फेरी काढली. प्रचार फेरीत महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरंभापासून ते समारोपापर्यत या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हवेत फडफडणारे महाआघाडीचे झेंडे, फुलांची उधळण, उमेदवार आणि नेत्यांच्या नावांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण प्रचार फेरी मार्ग महाआघाडीमय झाला होता.
यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार काँग्रेसचे नेते मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार दिप्ती चवधरी, काँग्रेसचे नेते डॉ. सतीश देसाई, नगसेविका लता राजगुरु, वैशाली मारणे, हजी चाँद बी नदाफ, अजित दरेकर, माजी महापौर रजनी त्रिभुवन, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे, कल्पना अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे नेते दत्ता सगरे, बाळासाहेब अमराळे, चंदन सुरतवाला, काँग्रेसचे ब्लाक अध्यक्ष नाना करपे, राष्ट्रवादीचे कसबा ब्लाॅक अध्यक्ष विठ्ठल हनमघर, कार्याध्यक्ष गणेश नलावडे, नरेश नलावडे आदी उपस्थित होते.
कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी महाआघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला. लाल महाल चौकात प्रचार फेरी येताच प्रचार फेरीवर कार्यकत्यांनी फुलांची उधळण केली. त्यानंतर उमेदवार अरविंद शिंदे व महाआघाडीच्या पदाधिकार्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. येथेही प्रचार फेरीचे फुलांची उधळण करून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीनाथ टाकीज चौकात भाऊ करपे यांनी उमेदवार व पदाधिकार्यांचे स्वागत केले. राष्ट्रभुषण चौकातही उमेदवाराचे महिलांनी औक्षण केले. काँग्रेस कार्यकत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यानंतर जेधे चौक मार्गे प्रचार फेरी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहोचली येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. प्रचार फेरी मार्गावर महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवरात्र महोत्सव, गणेश मंडळे, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, विक्रेत्यांनी शिंदे यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.