पुणे : ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘हवा मे उडता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का’, ‘इब के सजन सावन मे’ अशा जुन्या काळातील बहारदार गाण्यांना आपल्या सुमधूर आवाजाने सूरसाज चढवित आणि त्याचसोबत लतादिदिंच्या आठवणींना उजाळा देत तरुण कलाकारांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त अनोखी गानवंदना दिली.
पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी ‘दि वन अॅन्ड ओन्ली लता’ या संगीतमय कार्यक्रमातून सप्तसुरांची बरसात केली. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नजा लेले यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर स्वरदा गोडबोले यांनी ‘हवा मे उडता जाए’ या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली. सौरभ दफ्तरदार आणि कोमल कनाकिया यांनी गायलेल्या ‘बाहो मे चले आ’ या द्वंद्वगीताने रसिकांना संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली. ‘तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘तु जहॉ जहॉ चलेगा, मेरा साया साथ होगा’, ‘कही दिप जले’, ‘नाम गुम जाएगा’ अशा अजरामर गीतांनी तरुण गायक आणि वादकांनी लतादिदिंना त्यांच्या अप्रतिम योगदानासाठी गानवंदना वाहिली.
सौरभ दफ्तरदार, कोमल कनाकिया, स्वरदा गोडबोले, स्वप्नजा लेले या गायकांनी लतादीदी यांच्या गाण्यांना स्वरसाज चढविला. केदार परांजपे (सिंथेसायजर), दर्शना जोग (सिंथेसायजर), विशाल थेलकर (गिटार), निलेश देशपांडे (बासरी), अभिजित बधे (ऑकटोपॅड), अपूर्व द्रविड (तबला), अजय अत्रे (ढोलक) यांनी गायकांना साथसंगत केली. निरजा आपटे यांनी निवेदन केले.