पुणे . :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये ५ कि.मी ‘प्लॉग रन’ (चालता चालता केली जाणारी स्वच्छता) हा उपक्रम राबवण्यात आला.
गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या वतीने जीजीआयएस-संत तुकाराम नगर – नेहरू नगर – मगर स्टेडियम येथून परत जीजीआयएस(गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल) असे एकूण ५ किमीचे अंतर ‘प्लॉग रन’च्या दरम्यान पूर्ण करण्यात आले. अत्यंत उत्साहाने गोयलगंगा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचार्यांनी ही या उपक्रमामध्ये उत्साहाने भाग घेतला.कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जवळपास ६०० विद्यार्थी ५ किलोमीटर पर्यंत चालले.
यादरम्यान सर्वांनी वाटेत सापडलेला सर्व प्लास्टिक कचरा उचलून तेथील स्वयंसेवकांकडे दिला.नंतर हा सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून या अविघटनशील उत्पादनांचा पुनर्वापरावर काम करणार्या संस्थांना पाठविला गेला. सकाळी सहा वाजल्या पासून हा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता प्रत्येक विद्यार्थ्याने जपण्यासाठी आमची शाळा कायम प्रयत्नशील आहे. तसेच महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आमचा असाच सहभाग राहील. अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या.
सकाळी साडेसहा वाजता सोनू गुप्ता, भारती भागवाणी, गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल आणि गीता गोयल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या आवारात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींचे आवडते भजन गायले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक विनोद कुदळे गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल आणि गीता गोयल यांच्या उपस्थितीमुळे वातावरण आनंददायी बनले.
विनोद कुदळे म्हणाले कि, ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, अशा अनेक विषयांवर गांधीजींनी आपली मते मांडली. आजच्या बदलत्या काळातही ती सुसंगत आहेत. त्यांच्या विचारांचे महत्त्व नवीन पिढीला समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून त्याची उपयुक्तता कुदळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितली.