भावगीते, देशभक्तीपर गीतांवर लहानग्यांचा ताल
वंचित विकास संस्थेतर्फे अभिरुची वर्ग, फुलवातील बालकलाकारांसाठी अभिनय स्पर्धा
पुणे : दिल है छोटासा छोटीसी आशा… यह देश है वीर जवानों का… आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला… देवा श्री गणेशा… यासारख्या भावगीते, देशभक्ती गीत, बालगीतांवर लहानग्यांनी ताल धरला. निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धेचे. वंचित विकास संचालित अभिरुची वर्ग आणि फुलवातील बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
गरवारे बालभवन येथे झालेल्या या अभिनय स्पर्धेत संस्थेच्या वेगवेगळ्या वस्त्यामधील १० अभिरुची वर्गातील मुलांनी तसेच लालबत्ती विभागातील फुलवा प्रकल्पामधील मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ४ ते १२ वयोगटातील शंभर मुले सहभागी झाली होती. नाट्यछटा, नृत्य, समूहनृत्य, गायन, पोवाडा, कविता आदी प्रकारातील ४५ कलाविष्कार सादर केले. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपट गीते, भावगीते, भक्तीगीते देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळा असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे ‘मले बाजाराला जायचय बाई’ तसेच ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या नाट्यछटामधून लहानग्यांनी त्यांचे अभिनय कौशल्य दाखवले. फॅन्सी डेस या विभागात कोणी आंबा बनून आले, तर कोणी गुलाब झाले. बालकलाकारांनी सादर केलेल्या शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांने स्पर्धेची सांगता झाली. यावेळी उपस्थित मुलांनी आणि पालकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
अंबील ओढा, भवानी पेठ, समर्थ नगर, चुनाभट्टी, अंबिकानगर, सरंगमचाळ, जनता वसाहत, पवननगर, दांडेकरपूल आदी वस्त्यांवरील मुलांवरील मुले सहभागी झाली होती. मानसी करंदीकर, मधुरा गोकर्ण, श्रुती वेलणकर या स्पर्धेच्या परीक्षक होत्या. बुधाणी वेफर्स आणि हिंदुस्थान बेकरी यांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आला. संस्थेच्या तुप्ती फाटक यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सुमनताई शिरवटकर या संस्थेच्या देणगीदार आणि स्नेही असून, त्यांनी दिलेल्या देणगीचा वापर मुलांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून गेल्या चार वर्षापासून या स्पर्धा घेण्यात येतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वंचित विकासचे पदाधिकारी उपस्थित होते.