पुणे–
” गायिका श्रीपर्णा चटर्जी हिने गायलेले ‘ हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है ….’ हे गाणे आणि त्यावर अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईक हिने पेश केलेली ‘ ‘मुजरा नृत्या’ ची स्पेशल झलक यामुळे उपस्थित रसिक प्रेक्षक आनंदाने भारावून गेले आणि त्यांनीही टाळ्यांच्या गजरात त्या गाण्यावर ठेका धरला. निमित्त होते ‘ विभावरी चित्र ‘ च्या ‘वज्र’ या चित्रपटाच्या ‘संगीत अनावरण’ सोहळ्याचे. प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते ‘वज्र’ या चित्रपटाच्या सीडीचे शनिवारी सायंकाळी अनावरण करण्यात आले. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेते राहुल सोलापूरकर, कार्यकारी निर्माते शंतनु देशपांडे, दिग्दर्शक मयूर करंबळीकर, संगीतकार चंद्रमोहन, अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेते उल्हास आढाव आणि खास निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडलेला ‘वज्र’ चित्रपटाचा हा ‘संगीत अनावरण’ सोहळा चांगलाच रंगला.
प्रारंभी कार्यकारी निर्माते शंतनु देशपांडे यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात या चित्रपटाच्या निर्मितीचा आढावा घेतला. या चित्रपटाच्या निर्मितीची प्रेरणा लेखक असलेले आपले वडील प्रा. यशवंत देशपांडे यांच्याकडून मिळाली असे सांगून ते म्हणाले, पैरीस, जर्मनी आदी ठिकाणी चित्रीकरण झालेला ‘वज्र’ हा चित्रपट करमणुकीने भरलेला मसालापट होण्यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे असे ते म्हणाले. मानसी नाईक यांचे ‘मुजरा नृत्य’ हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे आणि त्यासाठी सर्वांनीच खास प्रयत्न केले आहेत, पडद्यावर त्याची साक्ष पटणार आहे असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी या चित्रपटाला शुभेच्छा देताना या कार्यक्रमाला आपण मित्रांच्या प्रेमापोटी आल्याचे आवर्जून सांगितले. मराठी चित्रपटांनी सध्या उत्तुंग झेप घातली आहे त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य फार उज्वल आहे असे सांगून त्यांनी मराठी चित्रपटांना सरकारकडून नेहमीच सहकार्य केले जाईल असे आश्वासनही दिले. श्री जाजू यांच्या हस्ते यावेळी अभिनेते उल्हास आढाव, गायिका श्रीपर्णा चटर्जी, गायक अमोल घाटे, गायक निलेश पांडे, समर्थ बारी आदी चित्रपटातील कलावंतांचा सत्कारही करण्यात आला.
अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी, मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन तरुण कलाकार येत असून त्यांच्या नवनव्या कल्पना विचारात घेऊन चांगल्या मराठी चित्रपटांची निर्मिती करून यश प्राप्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सध्याचे युग हे जाहिरातीचे युग असल्याने हल्ली चित्रपट निर्मितीबरोबरच चित्रपटाची प्रसिद्धीही (प्रमोशन) खूप महत्वाची झाली असल्याचे सांगितले.
या चित्रपटाचे गीतकार आणि संगीतकार अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणारे चंद्रमोहन यांनी आपल्या भाषणात, ‘वज्र’ ची संपूर्ण टीम तरुण असल्याने त्यादृष्टीने संगीत देण्याचे माझ्यापुढे आव्हान होते व मी ते स्वीकारले तिन्ही गाणी वेगवेगळ्या ढंगात करायचा प्रयत्न केला. मुजरा नृत्यासाठी हिंदी गीत मीच लिहिले मात्र त्यासाठी नृत्यांगना मानसी नाईक, नृत्यदिग्दर्शक बॉबी सय्यद यांनी खूप मेहनत घेतली. आशिष कुलकर्णी यांनी बागेश्री रंगात गायलेली खास पारंपरिक बंदिशही या चित्रपटात असून त्यासाठी पुण्याच्या अनव्य बैंडचे सहकार्य मिळाले असे ते म्हणाले. हा चित्रपट हिंदीतही पाहायला मिळेल अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
नृत्यांगना अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या मनोगतात ‘वज्र’ चे टीमवर्क अतिशय उत्तम होते हे आवर्जून सांगताना या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक बॉबी सय्यद आणि कैमेरामॅन यांनी खूप मेहनत घेतली असे सांगितले. माझे ‘मुजरा नृत्य’ म्हणजे मुजऱ्याच्या रूपात लावणी असून मराठी चित्रपटात हा प्रकार प्रथमच पाहायला मिळणार आहे. माझे गाणे म्हणजे ‘मराठमोळी मस्तानी’ दाखविण्याचा हा एक नवीन प्रयोग आहे असेही तिने सांगितले.
याप्रसंगी गायिका श्रीपर्णा चटर्जी, गायक अमोल घाटे, यांनी चित्रपटातील गाणी सादर करून उपस्थित प्रेक्षकांची छान करमणूक केली. पल्लवी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.