मुंबई, दि, 11. प्रबोधन गोरेगाव यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून यानिमित्ताने आजवरच्या वाटचालीला साजेसे काही नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून यंदा प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जगभरच्या मराठी कलावंतांनी केलेल्या मराठी लघुपटांसाठी हा स्वतंत्र आंतरराष्ट्रीय महोत्सव असणार आहे. ख्यातकीर्त चित्रपट अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांचे जाणकार अशोक राणे महोत्सव संचालक म्हणून लाभले आहेत. महोत्सवाची संपूर्ण आखणी त्यांनी केली आहे. सर्वोत्कृष्ट लघूपट क्रमांक एक ते तीन तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथाकार, छायालेखक, संकलक, अभिनेता,अभिनेत्री अशी वैयक्तिक स्वरुपाची भरघोस रकमेची रोख पारितोषिके, पदक आणि प्रमाणपत्रे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. याशिवाय 5 सर्वोत्कृष्ट लघूपट जगातल्या 3 प्रथितयश महोत्सवात पाठविले जाणार आहेत. ज्युरी म्हणून चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळी यात सहभागी होणार आहेत.
लघूपट निर्मिती करत असलेल्या नवागतांसाठी ‘लघूपट निर्मिती, मार्केटिंग आणि फेस्टिव्हल प्रमोशन ‘ या विषयावर विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विशेषज्ञ म्हणून अशोक राणे यांच्याबरोबर नामवंत व्याख्याते सहभागी होणार आहे. म्हणजे लघूपट निर्मिती करा, त्याचं सर्वांगीण शिक्षण घ्या, महोत्सवात सहभागी पुरस्कार मिळवा आणि परदेशातील महोत्सवात तुमचे लघूपट न्या, असा हा अभूतपूर्व महोत्सव होणार आहे.
यासाठी शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी पहिली कार्यशाळा होणार आहे. त्याआधी तुमच्या तयार असलेल्या फिल्म्स प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघूपट महोत्सवात पाठवा. आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे जाणकार आणि चित्रपट गुरू यांच्या बरोबर जगाच्या सफरीवर निघा.