पुणे: युनिव्हर्सल कन्सेप्ट मेंटल अरथमॅटिक सिस्टम (यूसीमास) तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. ८ जानेवारी रोजी होणार्या या स्पर्धेत १५२४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रमधील १२ जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्र येतील. बालेवाडी स्टेडियम येथे ही स्पर्धा होईल, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत यंग लर्नर्स अकॅडमी प्रा. लि. चे संचालक नितिन बेंद्रे यांनी दिली.
कॅम्प येथील सेंट मेरी स्कूल, डीपीएस कोंढवा, कल्याणी नगर आणि कॅम्प येथील बिशप स्कूल, खराडी येथील व्हिक्टोरीयस, कल्याणीनगर आणि कॅम्प मधील लेक्सीकाॅन, हडपसर येथील पवार पब्लिक स्कूल, लोहगावची विखे पाटील मेमोरीअल स्कूल, कोंढवा मधील संग्रेस, कोंढवा येथील कोठारी नॅशनल स्कूल, वाघोली मधील पोदार इंटरनॅशनल आदी शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत.यूसीमास ही एक जागतिक संघटना असून ५४ देशांमध्ये कार्यरत आहे. याचे मुख्यालय क्वालालंपूर, मलेशिया येथे आहे.
अबॅकस ट्रेनिंग ही अशी पद्धती आहे ज्यामुळे संपूर्ण मेंदूचा विकास होतो. प्राचीन काळी यामध्ये मणी आणि दांडीचा वापर केला जात असे. पाच ते १२ वर्षांच्या मुलांमधील एकाग्रता, अंकगणित क्षमता, तर्कशास्त्र, पृथक्करण कौशल्य, गती व अचूकता आदी गुणांचा विकास होतो.
बेंद्रे म्हणाले, अबॅकस प्रशिक्षणामध्ये वापरण्यात येणारी पद्धत केवळ अंकगणित सोपे करते असे नाही तर जीवन अधिक सुखकर आणि सोपे करते.या स्पर्धेत ८ मिनिटांमध्ये २०० प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्यातील बर्याचजणांना कॅल्क्युलेटरच्या साह्याने सोडवता येणार नाहीत असे प्रश्न यामध्ये असतील. हा व्हिज्युअल राउंड असेल. लिसनिंग राउंड मध्ये मुलांना प्रश्न खूप काळजीपूर्वक एेकून उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहायचे आहे. ही संख्या ३ अंकी ते ४० ओळीपर्यंत जाऊ शकते.
या स्पर्धेची २ मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. एक म्हणजे, सहभागी होणाऱ्या केंद्रातील मुलांनी जास्तीत जास्त सराव करावा, जेणेकरून त्यांच्या मेंदूचा विकास होईल. दुसरे म्हणजे, सर्वाधिक मुले त्यांच्या कम्फर्ट झोनमधून म्हणजेच शाळा किंवा केंद्राच्या बाहेर येतील आणि अनोळखी व्यक्तीच्या सूचना घेऊन चांगली कामगिरी करतील.पूर्ण स्पर्धेचा हा अनुभव मुलांना खूप काही शिकवुन जातो.