हेमंत रासनेंची महत्वाकांक्षी योजना -इंधन दरवाढीने हैराण जनतेला दिलासा देणार
पुणे : – पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच कमी अंतरावर प्रवासासाठी पर्याय मिळावा यासाठी सर्व पेठांमध्ये वातानुकुलित बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बसमधून 10 रुपयात दिवसभरात कोठेही प्रवास करता येणार आहे. यासाठी महापालिका लवकरच 50 मिडी बस खरेदी करणार असून, या बसेस मार्च अखेरपर्यंत रस्त्यावरुन धावतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. या मिडी बस खरेदीचा प्रस्ताव झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्यांमुळे वाहतुक कोंडी होत असते. ही वाहतुक कोंडी टाळण्यासाठी तसेच खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी शहरातील पेठांमध्ये मिडी बस चालवण्यात येणार आहेत. या बसमधून 10 रुपयात दिवसभरात कोठेही फिरता येणार आहे. यामुळे वाहतुक कोंडी कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पालिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या मिडी बसची किंमत 26 लाख 95 हजार 185 रुपये आहे. पालिका 50 मिडी बस खरेदी करणार असून यासाठी 13 कोटी 47 लाख 59 हजार 250 रुपये खर्चाला मंगळवारी मंजूरी देण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2019-20 या वर्षाच्या अंदाजपत्रकात ही योजना मांडली आहे. या बसेस शहरातील पुणे स्टेशन, स्वारगेट, आणि सर्व पेठांमध्ये धावणार आहेत. भविष्याचा विचार करुन शहराच्या इतर भागात देखील ही योजना राबवण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.