- स्वारगेट पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई६३ वर्षीय आरोपीला अटक; १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त; गुंगी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची दोन पाकिटे हस्तगत
पुणे | माय मराठी प्रतिनिधी
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी ओळख वाढवून त्यांना गुंगीकारक गोळ्या देत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत आरोपीला स्वारगेट पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. बाबू भुरे खान (वय ६३ वर्षे, रा. ऋषी नगर, तहसील सीतामऊ, जिल्हा मंदसौर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन दागिने जप्त केले आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी एसटी बसने प्रवास करीत असताना ही घटना घडली. आरोपीने फिर्यादींशी ओळख वाढवून स्वतःचे नाव संजय अगरवाल असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादींना संत्र्याच्या रंगाची गोळी दिली. ती खाल्ल्यानंतर फिर्यादी बेशुद्ध झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ आणि ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा मागगुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी तपास पथकाला आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.तपासादरम्यान हा गुन्हा मध्य प्रदेशातील बाबू भुरे खान याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. तेथील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही गुन्हे दाखलआरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता त्याच्याविरुद्ध नागपूर येथील रामटेक पोलीस ठाण्यात तसेच गुजरातमधील द्वारका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, पूर्वीच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून एकूण आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर तो २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला होता.चोरीचे सोने मुंबईतील झवेरी बाजारात विकल्याचे तपासात उघडस्वारगेट येथील गुन्ह्यात चोरी केलेली सोन्याची अंगठी तसेच अन्य सोन्याचे दागिने आरोपीने मुंबईतील झवेरी बाजार परिसरातील सराफ व्यावसायिकाला विकल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.त्यानुसार तपास पथकाने संबंधित सराफ व्यावसायिकाकडे जाऊन चौकशी केली. या कारवाईत प्रत्येकी एक तोळा वजनाचे सोन्याचे दोन दागिने, असा एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी प्रवाशांना बेशुद्ध करण्यासाठी ALPRAX 0.5 या नावाच्या गोळ्यांचा वापर करीत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले. आरोपीकडून प्रत्येकी १५ गोळ्या असलेली दोन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भास्कळ आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीपसिंग सिसोदे यांच्या आदेशानुसार तपास पथकाने ही कामगिरी केली.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसाट, पोलीस हवालदार प्रदीप शिंदे, तसेच पोलीस अंमलदार किरण रघतवान, नितीन शिरसागर, रमेश चव्हाण, अक्षय भोगे, युवराज राठोड, सोमनाथ बटूळे, किरण डाफकर आणि रोहित पोवार यांचा सहभाग होता.एसटी प्रवाशांना गुंगीकारक गोळ्या देऊन त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीचा मध्य प्रदेशापर्यंत माग काढून त्याला अटक करण्यात तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे.माय मराठी | महाराष्ट्राचा आवाज जगभर

